कृष्णा खोऱ्याच्या धर्तीवर मराठवाड्यात धरणांची गरज : राजेश टोपे

Aurangabad City news
Aurangabad City news

औरंगाबाद- ‘‘मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, धरणे सरासरी ५६ टक्केच भरतात. पाण्याची ही तूट भरून काढण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील हक्काचे व पश्‍चिम वाहिन्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे. कृष्णा खोऱ्याच्या धर्तीवर अतिरिक्त पाणी साठविण्यासाठी मराठवाड्यात धरणांची गरज आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठवाड्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’’ अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता. २०) दिली. 

मराठवाड्यातील पीक आणि पाणी प्रश्‍नावर मंथन करून दिशा ठरविण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे गुरुवारी परिषद घेण्यात आली. यावेळी श्री. टोपे बोलत होते. संयोजक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार सतीश चव्हाण, अंबादास दानवे, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले, अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील, माजी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. श्री. टोपे म्हणाले, ‘‘मराठवाड्यातील धरणे, सहा वर्षांतून एकदाच भरतात.

काही वेळा पाणी वाहूनही जाते. म्हणून ज्याप्रमाणे कृष्णा खोऱ्यात ५८२ टीएमसी पाणी उपलब्ध असताना ७१६ टीएमसी पाणी साठविण्याच्या क्षमतेचे धरणे बांधण्यात आली, त्याप्रमाणे मराठवाड्यात धरणे बांधण्याची गरज आहे. पश्‍चिम वाहिनी नद्यांचे १६२ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी आणू शकतो; मात्र त्यासाठी शासनस्तरावर इच्छाशक्ती व मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र आले पाहिजे,’’ असे आवाहन त्यांनी केले. कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्यासाठी २१ टीएमसी पाणी मंजूर आहे; मात्र केवळ सातच टीएमसी पाणी मिळत आहे, अशीही खंत टोपे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकात श्री. खैरे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार ही परिषद घेतली जात असून, यातील मंथनाचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे,’’ अशी माहिती त्यांनी दिली. ‘‘सरकार कोणतेही असो, मराठवाड्यातील पाण्याच्या प्रश्‍नासाठी एकत्र येत वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याची गरज आहे. त्यासाठी उपोषणाचा मार्ग निवडावा लागेल,’’ असे माजी आमदार डॉ. कल्याण काळे म्हणाले. 

आणलेले पाणी ठेवणार कुठे? 
माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, ‘‘मराठवाड्याच्या पाणीप्रश्‍नावर अनेकवेळा चिंतन झाले आहे. आपण पाणी इतर ठिकाणाहून आणूही; पण हे पाणी कुठे ठेवणार? धरणे बांधण्यासाठी शेतकरी जमिनी देण्यास तयार नाहीत. त्यामुळे नद्या खोलीकरण व बंधाऱ्यांची कामे करणेही गरजेचे आहे. पावसाचे पडलेले पाणी गावाच्या बाहेर वाहून नेण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे. मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर विधिमंडळात वारंवार वाचा फोडावी लागेल. त्याशिवाय पाणीप्रश्‍न मिटणार नाही.’’ 
 
सिंचन घोटाळ्याच्या गाडीभर पुरव्यावरच भाजपला सत्ता 
सिंचन घोटाळ्याचा मोठा इश्‍यू करीत गाडीभर पुराव्याची भाषा भाजपने केली. त्यावरच त्यांना सत्ता मिळाली; मात्र त्यानंतर जलयुक्त शिवार अभियानात गडबडी झाल्या. ही योजना बंद केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करतो, असे एच. एम. देसरडा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com