वजन 120 किलो...वय 60...जिद्दीने केली कोरोनावर मात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

बेगमपुऱ्यातील साठवर्षीय महिलेला ताप, सर्दी, खोकला, श्वसनाचा त्रास सुरू झाला. कोरोनाचे निदान झाले. त्यात त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह या व्याधी होत्या. त्यांचे वजनही १२० किलो होते. त्यांची जिद्द आणि डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी त्यांनी कोरोनावर मात केली. 

औरंगाबाद - आईची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर आधीच चार विविध शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. या सर्व व्याधी असताना, गंभीर स्थितीतही  डॉक्टरांनी चांगले उपचार करून माझ्या आईचे प्राण वाचवले. हा तिचा पुनर्जन्मच असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत कोविडच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या महिलेच्या मुलाने. 

हे ही वाचा : औरंगाबादेत रुग्णांचा आलेख वाढला, आज ६३ बाधित

अकरा दिवस व्हेंटीलेटरवर
बेगमपुऱ्यातील ज्येष्ठ महिलेला ताप, सर्दी, खोकला, श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह या व्याधी होत्या. त्यांचे वजनही १२० किलो होते. त्यांचा मुलगा डॉक्टर असल्याने त्यांनी लक्षणे ओळखून खासगी रुग्णालयात त्यांची कोविड चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना कोविड अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास व त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले व ऑक्सिजनचे प्रमाणही कमी झाले होते. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर लावण्यात आले. त्यांना समुपदेशन, फिजिओथेरपीही सुरू केली. अकरा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर त्या बऱ्या झाल्या. या काळात त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी होती. या रुग्णाच्या उपचारासाठी अधिष्ठाता डॉ. राजेश बोहरा, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, अधीक्षक डॉ. राघवन यांच्या सूचनेनुसार कोविडसंदर्भातील मुख्य समन्वयक डॉ. आनंद निकाळजे, डॉ. रोहन गुंड्रे, डॉ. प्रशांत अक्कूलवर, डॉ. प्रदीप तौर, डॉ. योगेश अडकिने आदींनी मेहनत घेतली. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात

ज्येष्ठ नागरिक, विविध व्याधींनी ग्रस्त किंवा गंभीर रुग्णांना वाचवणे अशक्य असल्याचा संभ्रम या वृद्धेवरील उपचाराने दूर केला आहे. चांगले उपचार व डॉक्टरांच्या प्रयत्नांनी असे रुग्ण बरे होतात, याचा आनंद व समाधान आहे. 
डॉ. आनंद निकाळजे, मुख्य समन्वयक (कोविड), एमजीएम रुग्णालय 

दोन आठवडे रुग्ण व्हेंटिलेटरवर होत्या. या रुग्णासाठी आम्ही आयसीयूतच डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. कोविडच्या प्रतिकारासाठी आम्ही तयार केलेल्या सर्व पायाभूत सुविधा आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने हे सर्व शक्य होत आहे. 
डॉ. प्रवीण सूर्यवंशी, उपअधिष्ठाता, एमजीएम रुग्णालय 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weight 120 kg ... age 60 ... stubbornly defeated Corona