कोरोनामुळे विद्यार्थ्यांना मिळेना शालेय पोषण आहार..

संदीप लांडगे
Tuesday, 24 March 2020

तीन महिन्यात ग्रामीण भागात राहाणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यावर मात्र, उपासमारीची वेळ येणार आहे.

औरंगाबाद - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या शासनाकडून मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. कोरोनामुळे पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करुन सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दरवर्षी शासनाकडून उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेत येतील त्यांना मीड डे मील; तसेच पोषण आहार सुरु केला होता. मात्र, कोरोनामुळे सध्या ही योजना बंद ठेवण्यात आल्याने ग्रामीण भागतील गरीब विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एप्रिल आणि मे महिन्यातही शालेय पोषण आहार दिला जातो. राज्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी दुष्काळी परिस्थिती असते. पिण्यासाठी पाणीटंचाई भासते. मागील वर्षी महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यांत भीषण दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. 

हेही वाचा- होम क्वारंटाईन असलेल्यांच्या घरासमोर लागणार फलक

या २६ जिल्ह्यांतील जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात शालेय दिवस आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती विचारात घेता सुट्टीत पोषण आहार सुरु केला होता. याचा अनेक विद्यार्थ्यांनी फायदा घेतला होता. यंदा मात्र, कोरोनामुळे सर्व शाळांना १५ मार्चपासूनच सुट्टी देण्यात आली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे तीन महिने विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. 

हेही वाचा- कोरोनाची धास्ती 59 हजार प्रवाशांची तपासणी

या तीन महिन्यात ग्रामीण भागात राहाणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यावर मात्र, उपासमारीची वेळ येणार आहे. दुष्काळ व टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुटीतही विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन देण्यात यावे; तसेच या विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस अंडी, दूध, फळे, पौष्टिक आहारही उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी पालक करीत आहे.
--


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why not get school nutrition for children?