‘क्वॉरंटाईन’ नागरिकांच्या घरावर लागणार फलक

  सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

होम क्वॉरंटाईन केलेल्यांच्या घरासमोर महापालिकेतर्फे स्टिकर लावले जात आहेत. तसेच राज्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरात ३५२ आयसोलेशन बेडची व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे.

औरंगाबाद : विदेशातून शहरात आलेले प्रवासी व त्यांच्या संपर्कात आलेले पण ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत, अशा नागरिकांना सध्या होम क्‍वॉरंटाईन केले जात आहे. मात्र, अनेकजण होम क्‍वॉरंटाईन झाल्यानंतर शहरात फिरत असल्याच्या तक्रारी समोर येत असून, याबाबत सर्वांना माहिती व्हावी यासाठी होम क्वॉरंटाईन केलेल्यांच्या घरासमोर महापालिकेतर्फे स्टिकर लावले जात आहेत. तसेच राज्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरात ३५२ आयसोलेशन बेडची व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे. 

कोरोना व्हायरसची महिला रूग्ण आढळून आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्‍वभूमीवर सर्वच यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेने शहरातील अनेक जागा ताब्यात घेऊन सुमारे २३०० अलगीकरण व विलगीकरण वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. तसेच विमानतळ, सिडको व मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन, छावणी नगरनाका, पैठण रोड-बीडबायपास, हर्सूल टी पॉइंट, केंब्रीज चौक येथे प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जात आहे. जे संशयित आहेत त्यांना होम क्‍वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांना १४ दिवस निगराणीत ठेवले जाईल. त्यासाठी रोज आरोग्य विभागाचे पथक त्यांच्या घरी जाऊन तपासणी करीत आहे. होम क्‍वारंटाईन केलेल्यांना शिक्का मारण्यात आला असून, आता त्यांच्या घरासमोर स्टिकर देखील लावले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. अर्चना राणे यांनी सोमवारी (ता. २३) महापौर नंदकुमार घोडेले यांना दिली. 

हेही वाचा- समजून घ्या जमावबंदी आणि संचारबंदीतील फरक

पाच टक्के कर्मचाऱ्यांची महापालिकेत उपस्थिती 

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने तयारी सुरू केली आहे. शासनाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांच्या हजेरीबाबत आदेश काढण्यात आले आहेत. याबाबत महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, प्रत्येक विभाग आणि प्रभाग कार्यालयात पाच टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवावी, अशा सूचना आयुक्तांनी विभागप्रमुखांना केल्या आहेत. नगररचना, विधी, आस्थापना या विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम धोरण राबविण्याचे नियोजन करावे, असेही सांगण्यात आले आहे. अग्निशमन, पाणीपुरवठा, घनकचरा, ड्रेनेज, आरोग्य विभागाच्या सेवा या अत्यावश्यक असल्याने या विभागांतील सर्वच अधिकारी, कर्मचारी कामावर आहेत. त्यांना आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याची सूचना महापौर घोडेले यांनी केली. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona News Aurangabad