औरंगाबादेत आठ दिवसांत सर्वाधिक ८६० तरुणांसह ज्येष्ठांना कोरोनाची लागण

मधुकर कांबळे
Monday, 30 November 2020

दिवाळीच्या आधी कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता, मात्र दिवाळीच्या उत्साहात लोक घराबाहेर पडले. आता दिवाळीचा फेस्टिव्हल माहोल सरल्यानंतर कोरोनाबाधितांचे आकडे बाहेर यत आहेत.

औरंगाबाद : दिवाळीच्या आधी कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता, मात्र दिवाळीच्या उत्साहात लोक घराबाहेर पडले. आता दिवाळीचा फेस्टिव्हल माहोल सरल्यानंतर कोरोनाबाधितांचे आकडे बाहेर यत आहेत. दिवाळीनंतर रुग्णांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसात कोरोनाचे ९२७ रुग्ण वाढले असून त्यामध्ये सर्वाधिक ८६० तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात कोरोना पसरण्याचा धोका वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरुच ठेवली आहे. तरी देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. महापालिकेच्या अहवालानुसार गेल्या रविवारपासून (ता.२२) शहरात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार करत आहे. हा आकडा अद्यापही कमी झालेला नाही. शनिवारी (ता.२१) प्राप्त अहवालानुसार एकूण कोरोना रुग्णांची संख्या २७ हजार ५४ इतकी होती. त्यामध्ये १८ ते ५० वयोगटातील तरुणांची संख्या १५ हजार ४८९ तर ५० वयोगटापेक्षा अधिक व्यक्तींची संख्या ७ हजार ६५७ इतकी होती. २९ नोव्हेंबरच्या अहवालानुसार कोरोना रुग्णांची संख्या २७ हजार ९८१ इतकी झाली आहे.

यामध्ये १८ ते ५० वयोगटातील तरुणांची संख्या १६ हजार ३४ इतकी असून जेष्ठ नागरिकांची संख्या ७ हजार ९७२ इतकी झाली आहे. आठ दिवसांतच कोरोना रुग्णांमध्ये तरुणांची संख्या ५४५ ने वाढली तर जेष्ठ नागरिकांची संख्या ३१५ ने वाढली आहे. आठ दिवसांत एकूण ९२७ कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा होण्याचा धोका वाढला असल्याचे सुत्रांनी सांगितले. शहरात दिवाळीपूर्वी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक होते. परंतु दिवाळीनंतर रुग्णंसख्या वाढत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील हळूहळू कमी होत आहे. आता हे प्रमाण ९४.२५ टक्के इतके असून आठ दिवसातच हे प्रमाण ०.७५ टक्क्यांनी कमी झाले आहे. मृत्यूदराच्या प्रमाणात काही अंशी घट झाल्याचे अहवालाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within Eight Days 860 Youth With Seniors Infected Covid Aurangabad News