esakal | औरंगाबादेत आता जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची होणार तपासणी 
sakal

बोलून बातमी शोधा

kalanbh.jpg

संभाव्य दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासन अलर्ट, जिल्ह्यात साडेनऊशे रुग्ण 

औरंगाबादेत आता जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची होणार तपासणी 

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : दिवाळीनंतर जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात रोज सरासरी रूग्ण शंभरी गाठत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. संभाव्य लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परजिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
राजधानी दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. तसेच राज्याची राजधानी मुंबईतही कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. शनिवारी (ता. २८) राज्यभरात पाच हजारांपेक्षा अधिक कोरोना रूग्ण आढळल्याने राज्य सरकारने देखील खबरदारी घेण्याच्या सूचना यंत्रणेला केल्या आहेत. दरम्यान, दिवाळीच्या काळात बाजारपेठांत खरेदीसाठी झालेल्या गर्दीचे परिणाम आता दिसू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात रोजचे शंभर ते सव्वाशे रूग्ण आढळत आहेत. यात सर्वाधिक संख्या ही शहरातील रूग्णांची आहे. त्यामुळे जिल्हा व शहरात कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महापालिका प्रशासनाने शहरात विमानतळ, रेल्वेस्टेशनवर दिल्लीसह इतर शहरांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी सुरू केली आहे. त्यातून रोज दोन ते चार प्रवाशी पॉझिटिव्ह आढळत आहेत. यामुळे बाहेरून येणारे कोरोना रूग्ण वेळीच शोधले जात असून त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये हलविले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यास बरीच मदत होणार आहे. तथापि, जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मार्गांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना चाचणीसाठी पथके तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार नियोजन केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नऊशे रुग्णांवर उपचार 
महापालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार शहरात सध्या ९३६ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ७४६ रूग्ण हे शहरातील आहेत. तसेच १६९ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहे. २१ रूग्ण औरंगाबाद बाहेरचे असून ते उपचारासाठी दाखल झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

go to top