चोवीस तासात मराठवाड्याच्या चाळीस मंडळांमध्ये अतिवृष्टी

मधुकर कांबळे
Wednesday, 14 October 2020

मराठवाड्यात परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने गेल्या चोवीस तासात विभागातील ४० महसूली मंडळांना अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने गेल्या चोवीस तासात विभागातील ४० महसूली मंडळांना अतिवृष्टी झाली. विशेषतः: लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक जोर होता. या दोन्ही जिल्ह्यातील नदी, ओढ्यांसह रस्तेदेखील जलमय झाले. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये चोवीस तासात दमदार पाऊस झाला. लातूर जिल्हयात सरासरी झालेल्या ६८ मिलिमीटर पाऊस झाला.

या जिल्ह्यातील लातूर, निलंगा, औसा, चाकूर, उदगीर, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ३४ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात २६.८ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील तुळजापूर व उमरगा तालुक्यांतील ६ मंडळांना अतिवृष्टी झाली. गेल्या चोवीस तासात विभागातील इतर जिल्ह्यात दहा मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला. राज्यात पुढील चार दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पाऊस झाला मात्र लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले.

लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले, ३५ मंडळात अतिवृष्टी, शेतकरी अडचणीत !

अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर, बाभळगाव, कासारखेडा, चिंचोली, कनेरी, औसा तालुक्यातील औसा, लामजना, भादा, बेलकुंड, किन्ही, किल्लारी, निलंगा तालुक्यातील निलंगा, पानचिंचोली, निटूर, औराद, कासार बालकुंद, अंबुलगा, मदनसुरी, कासार शिरशी, हलगरा व भातमुगळी, उदगीर तालुक्यातील नागलगाव, नळगीर व मोघा, चाकूर तालुक्यातील चाकूर, नळेगाव, शेलगाव, आष्टा, देवणी, बोरोळ, वाळंदी, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील शिरुर अनंतपाळ, साकोळ व उजेड या महसूली मंडळांना अतिवृष्टीने झोडपले. उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या सहा मंडळांमध्ये तुळजापूर तालुक्यातील सलगरा व उमरगा तालुक्यातील उमरज, डाळिंब, नरंगवाडी, मुळज व मुरुम मंडळांचा समावेश आहे. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश नदी, नाले, ओढ्यांना पूर आला असून अनेक गावातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within Twenty Four Hours Heavy Rain In Fourty Revenue Circles Of Marathwada