या काही आजारांबद्दल महिला कधीच बोलत नाहीत...

टीम ई सकाळ
Sunday, 8 March 2020

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने का होईना पण महिलांकडे, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अपरिहार्य आहे हे आतातरी लक्षात आलं पाहिजे. महिलांच्या मुख्यत्वे दुर्लक्षिल्या जाणाऱ्या आजारांबद्दल शल्यविशारद आणि आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. शुभदा राहुल लोणीकर यांनी खास eSakal.com साठी दिलेली माहिती. 

संपूर्ण कुटुंबाचा, पर्यायाने समाजाचा आधारस्तंभ असणारी स्त्री ही अनेक कारणांनी, किंवा स्वभावतःच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असते. सहनशीलता म्हणजे स्त्री हे कुठेतरी  स्त्रियांच्या मनावर बिंबविले  गेले आणि स्वतःला दुय्यम स्थान देणं हा त्यांचा स्वभाव होऊन बसला.

संपूर्ण कुटुंबाचा, पर्यायाने समाजाचा आधारस्तंभ असणारी स्त्री ही अनेक कारणांनी, किंवा स्वभावतःच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असते. सहनशीलता म्हणजे स्त्री हे कुठेतरी  स्त्रियांच्या मनावर बिंबविले  गेले आणि स्वतःला दुय्यम स्थान देणं हा त्यांचा स्वभाव होऊन बसला.

पण मुख्यतः जर आपल्याला आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ व्हायचं असेल, तर तो मजबूत असायलाच हवा. तरच सगळा डोलारा विनासायास पेलता येईल, हे प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या मनावर बिंबवणे ही काळाची गरज आहे.

स्त्रियांना सर्वसामान्य, इतरांसारख्याच अनेक व्याधी ग्रासू शकतात. शिवाय निसर्गाने जे पुनर्निर्मितीचे वरदान दिलेले आहे, त्या अनुषंगाने काही गोष्टी अधिकच पेलाव्या लागतात.

निसर्ग चक्राप्रमाणे स्त्रीच्या आयुष्यातील, वयोमानानुसार होणारे बदल,
१) पाळी सुरू होणे
२) गर्भधारणा होणे
३) पाळी बंद होणे

या तीनही टप्प्यांवर शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने, तिचे आरोग्य सुदृढ राहील याची काळजी, सर्वप्रथम स्त्रीने व तिच्या बरोबर तिच्या कुटुंबियांनी घेणे गरजेचे आहे.

माझ्या इतक्या वर्षांच्या वैद्यकीय अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली आहे. स्त्रिया एक तर स्वतःला, स्वतःच्या त्रासाला फार महत्त्व देत नाहीत आणि दुसरं त्यांची तयारी झालीच तरी डॉक्टर पुरुष आहे. त्यांना कसं दाखवू ही समस्या समोर करून परत टाळाटाळ सुरू होते. मुख्यतः गुदगत व्याधींबद्दल हे जास्त प्रमाणात बघायला मिळतं.

क्लिक करा - ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण असे...

शौचाच्या जागेवर होणारा कुठलाही त्रास हा एकट्या मूळव्याधीच्या सदरात मोडत नाही, हा ही लोकजागृतीचा विषय आहे. अनेक वेळा ती साधी फिशर म्हणजे चीर असू शकते, जी थोड्याफार उपाय योजनांनी सहजरीत्या बरी होऊ शकते. या व्याधीत संडासला त्रास होणे, संडास कडक होणे, संडासला लागून रक्त पडणे, संडासच्या वेळी व काही अंशी त्यानंतरही आग होत राहणे, अशी लक्षणे दिसतात.

दुर्लक्ष करून रोग जुनाट करू नका

दुर्लक्ष करून रोग जुनाट केल्यास त्याचे कोंब तयार होऊन (स्किन टॅग) ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही. फिशर ही सगळ्यात साधी आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये आढळणारी आणि वेळेवर निदान झाल्यास सहज बरी होणारी व्याधी आहे.

मूळव्याध किंवा हिमोर्हॉइड हा शब्द सर्वसामान्यांना परिचित आहे. पण ह्यासंबंधी बरीच चुकीची माहिती डोक्यात असू शकते. या व्याधीत मुख्यतः गुदमार्गातील रक्तवाहिन्यांचा समावेश असतो. रक्तवाहिनीवरती आवरण आतल्या त्वचेचं (mucosa) आहे, की बाहेरच्या त्वचेचं, त्याच मूळ, सुरुवात कुठून आहे यावर त्याचे प्रकार, लक्षणे आणि त्याची चिकित्सा किंवा उपाययोजना ठरते.

अशा असतात विविध स्टेजेस

कोंब हाताला लागणे, न लागणे असे कोणतेही स्वरुप असू शकते. त्याच्याही इतर अनेक रोगांसारख्या स्टेजेस असतात. त्यावरून आपण तो कसा बरा करू शकतो हे ठरतं. त्याच्या लक्षणांमध्ये संडासला जोर लावावा लागणे, आधी किंवा नंतर (मूळव्याधीच्या प्रकाराप्रमाणे) रक्त पडणे, चिरकांडी किंवा टपटप रक्त पडणे, बाहेरच्या मूळव्याधीत वेदनासहित किंवा आतल्या मूळव्याधीत वेदनारहित लक्षणे असतात.

भगंदर हा रोग गुदभागाच्या आसपास होत असला, तरी त्यात पाइल्स आणि फिशरपेक्षा वेगळी लक्षणे असतात. फोड तयार होणे, पू वाहणे, मध्येच बरा होऊन परत फुटणे अशी लक्षणे दिसू शकतात. याचं शक्य तितक्या लवकर निदान होणे अत्यावश्यक आहे. तरच कमी उपद्रवांमधे आपण ही व्याधी पूर्णतः बरी करू शकतो.

हेही वाचा - कोरोनाला घाबरू नका, ही घ्या काळजी

या जागेवर होणाऱ्या सर्व व्याधींचे निदान हे तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच होणे गरजेचे आहे एवढे लक्षात ठेवा. निश्चित निदान होणे ह्यावरच अनेक व्याधींचे बरे होणे, लवकर बरे होणे, कुठल्याही उपद्रवाशिवाय बरे होणे अवलंबून असते. गुद मार्गातील अनेक रोगांचे प्रमुख कारण पचन नीट न होणे हे असते. त्यामुळे पचनाकडे लक्ष देणे, त्यात बिघाड असल्यास त्यावर चिकित्सा करणे ही प्राथमिक गरज असते.

  • पाणी पिण्याचे प्रमाण नीट ठेवणे
  • जेवल्याबरोबर पाणी न पिणे
  • जेवल्या बरोबर न झोपणे
  • आंबवलेले किंवा नासवून तयार केलेले पदार्थ टाळणे (जसे डोसा, उत्तप्पा, इडली, ब्रेड)
  • काळा मसाला, गरम मसाला टाळणे
  • जे उशिरा शिजतं, ते उशिरा पचतं या न्यायाने अशा पद्धतीचे अन्न अशा रुग्णांनी पूर्णतः टाळावे. (उदाहरणार्थ हरबऱ्याची डाळ, मांसाहार इत्यादी.)

अनेक आजार, तात्पुरता त्रास आहे, होईल बरा म्हणून दुर्लक्षित केल्याने वाढू शकतात. याची जाणीव ठेवली पाहिजे. आपण लवकरात लवकर डॉक्टरांना गाठून आपल्या व्याधी किंवा आपल्या त्रासाचे निदान केलं पाहिजे. एवढं जरी प्रबोधन ह्या निमित्ताने झालं, तरी या लेखाचं उद्दिष्ट पूर्ण झालं असं मी समजेन, असंही डॉ. शुभदा लोणीकर म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Health Article By Dr Shubhada Lonikar