औरंगाबादहून एमपीकडे पायी निघालेल्या ८६ कामगारांना अडविले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

रराज्यांतून आलेल्यांची घराकडे जाण्यासाठी खटपट सुरू आहे. मध्य प्रदेशच्या दिशेने निघालेले हे ८६ मजूर औरंगाबाद येथील काही खासगी कंपन्यांमध्ये कामाला होते. काहीजण चार-पाच वर्षांपासून, तर काही कामगार आठ ते दहा वर्षांपासून औरंगाबाद येथे काम करीत आहेत. 

कन्नड, (जि. औरंगाबाद) - सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर ८६ कामगार रविवारी (ता. २९) दुपारी औरंगाबादहून मध्य प्रदेशकडे पायी जाताना कन्नड येथे आढळून आले. येथील प्रशासनाने त्यांना अडवून रात्री त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. दरम्यान, त्यांच्या मालकांशी संपर्क करून त्यांना परत घेऊन जाण्यास सांगण्यात आले असून, त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशांतर्गत सर्व सीमा खासगी आणि सरकारी वाहनांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परराज्यांतून आलेल्यांची घराकडे जाण्यासाठी खटपट सुरू आहे. 
मध्य प्रदेशच्या दिशेने निघालेले हे ८६ मजूर औरंगाबाद येथील काही खासगी कंपन्यांमध्ये कामाला होते. काहीजण चार-पाच वर्षांपासून, तर काही कामगार आठ ते दहा वर्षांपासून औरंगाबाद येथे काम करीत आहेत. 

औरंगाबादहून मध्य प्रदेशकडे निघालेल्या या कामगारांना आपण आपल्या घरी केव्हा पोचू हे माहीत नाही. रस्त्याने कोणी कोणी पाणी, बिस्किटाच्या स्वरूपात मदत करतात. त्यांच्याकडे थोडेफार पैसे आहेत. किराणा दुकान दिसले की चिप्स, फळांच्या दुकानातून ते फळे घेतात. 

- उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत आढळला पहिला पेशंट; रिक्षाचालकाला कोरोनाची लागण
  
डॉ. मनोज राठोड यांनी सर्व कामगारांना दिले जेवण 

प्रशासनाने कन्नडला या कामगारांना अडवून त्यांना शहरातील शिवाजी महाविद्यालय येथे आश्रयासाठी पाठविले. या ठिकाणी त्यांची रात्रीची जेवणाची व्यवस्था डॉ. मनोज राठोड यांनी केली. उपविभागीय अधिकारी (महसूल) जनार्दन विधाते, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश सातव, तहसीलदार संजय वाडकर, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर रेंगे यांनी या कामगारांच्या मालकांशी संपर्क साधून त्यांना परत घेऊन जाण्यास सांगितले.

त्यांच्या औरंगाबाद, वाळूजपर्यंतच्या प्रवासासाठी प्रशासनाने बसची व्यवस्था करून दिली असून, त्यांना त्यांच्या मूळ मालकांकडे पाठवून देणार आहेत. तेथे सदर मजुरांच्या जेवणाची, राहण्याची सोय मालकांकडून करण्यात येणार आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नंदा गायकवाड, नायब तहसीलदार शेख हरुण, कॅप्टन विजय देशमुख आदी उपस्थित होते. 

- Coronavirus : 'हे' आहेत जगातील 'टॉप १०' खतरनाक व्हायरस!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers Leave Their Homes On Foot