ब्रिजवाडीत दोन मल्लांची झुंज 

अनिल जमधडे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

अझहर पटेल (हर्सूल) आणि जगदीश राजपूत (रोहिलागड) यांच्यात शेवटची कुस्ती अत्यंत चुरशीची झाली. या कुस्तीची झुंज तब्बल 22 मिनिटे सुरू होती. दोघेही एकापेक्षा एक सरस मल्ल असल्याने पंचाने कुस्ती बरोबरीत सोडली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त ब्रिजवाडी येथे कुस्ती स्पर्धा झाली. अझहर पटेल (हर्सूल) आणि जगदीश राजपूत (रोहिलागड) यांच्यात शेवटची कुस्ती बरोबरीत सुटली. 

पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, नगरसेवक राजू शिंदे, गोकुळ मलके, भगवान रगडे, अंबादास घागरे, सुभाष हिवराळे, राजू घागरे, नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक अरुणा कोचुरे, मनोज बोरा, विशाल सानप, उत्सव समिती अध्यक्ष संजय ढगे, उपाध्यक्ष अमोल गायकवाड, सचिव मिलिंद निकाळजे, सहसचिव राहुल पट्टेकर, उज्ज्वल भालेराव, कोषाध्यक्ष सुनील गडवे, श्रीकांत हिवराळे, अमोल शिंदे, संजय ढगे, अमोल गायकवाड, मिलिंद निकाळजे, काकासाहेब पट्टेकर, बाबासाहेब नरवडे, गणेश साबळे यांच्यासह पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कुस्ती स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. 

क्‍लिक करा : वाहनांच्या फास्टॅगला लागलाय ब्रेक 

तब्बल 22 मिनिटे झुंज 

अझहर पटेल (हर्सूल) आणि जगदीश राजपूत (रोहिलागड) यांच्यात शेवटची कुस्ती अत्यंत चुरशीची झाली. या कुस्तीची झुंज तब्बल 22 मिनिटे सुरू होती. दोघेही एकापेक्षा एक सरस मल्ल असल्याने पंचाने कुस्ती बरोबरीत सोडली. स्पर्धेत मातोश्री वेणूबाई कुंडलिक हिवराळे आणि सांडूबाबा हिवराळे यांच्या स्मरणार्थ मायादेवी बहुउद्देशीय सेवाभावी विकास संस्थेतर्फे विजेत्या मल्लास ढाल, प्रमाणपत्र देण्यात आले. संजय ढगे यांनी मातोश्री कमलबाई ढगे त्यांच्या स्मरणार्थ सुवर्णकप दिला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अलमनूर पठाण, योगेश हिवराळे, संजय हिवराळे, अण्णा पाखरे, पिंटू हिवराळे यांच्यासह ब्रिजवाडी येथील उत्सव समितीचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले. 

वीस वर्षापासून स्पर्धा 

ब्रिजवाडी येथे नामविस्तार दिनानिमित्त गेल्या वीस वर्षापासून ही कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत जालना, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, नाशिक या भागातील मल्ल कुस्ती स्पर्धेसाठी दाखल होतात. गतवर्षी बिहार येथील मल्लांनी देखील या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. 

हेही वाचा : उदयनराजेंद्र राऊतांच्या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे 

पहिली कुस्ती दहा रुपयांची 

दहा रुपयांपासून सुरू होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत शेवटची कुस्ती 11051 रुपयाची खेळविली जाते. युवकांनी ठरविलेल्या मराठमोळ्या महाराष्ट्रातील मैदानी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून मराठवाड्याच्या मातीतील खेळ टिकविण्याचे काम ब्रिजवाडीतील युवकांनी टिकून ठेवले आहे. मैदानी खेळ टिकविण्यासाठी मायादेवी बहुउद्देशीय सेवाभावी विकास संस्था यांच्यातर्फे मल्लांची उत्सुकता वाढवण्यासाठी दोन ढाल देऊन गौरव करण्यात येत आहे. यांदाच्या स्पर्धेत साडेपाचशे मल्लांनी सहभाग घेऊन नामविस्तार दिनाच्या कुस्ती स्पर्धेत उत्साह वाढवला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wrestling In Brijwadi Aurangabad News