योगींनी मुंबईत सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरेंना भेटायला हवे होते : इम्तियाज जलील

गणेश पिटेकर
Wednesday, 2 December 2020

महाराष्ट्रात यायचे. येथील उद्योगपतींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीला आवाहन करायचे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना योगी आदित्यनाथ भेटत नाहीत. याचा अर्थ काय?  
 

औरंगाबाद : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत आल्यावर सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘ ई सकाळ’शी बोलताना दिली आहे. योगी हे महाराष्ट्रात येऊन बॉलिवूड जगतातील सिनेतारे-तारकांची भेट घेत आहेत. तसेच त्यांनी मुंबईत उद्योगपतींची भेट घेतली आहे. येथील बॉलिवूड उत्तर प्रदेशात नेण्याचा प्रयत्न योगींकडून केला जात असल्याचे आरोप-प्रत्यारोप होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘ई सकाळ’ने खासदार जलील यांच्याशी संवाद साधला.

खासदार जलील म्हणाले, की महाराष्ट्रात सर्वकाही आहे. या राज्याचा नावलौकिक आहे. उत्तर प्रदेशात फक्त जात, धर्माला जास्त महत्त्व दिले जाते. इकडेचे (महाराष्ट्रातील) उद्योगपती वेडे नाहीत. ते पैसे वाया घालवणार नाहीत. अक्षय कुमार हे फिल्म इंडस्ट्री नाही. उत्तर प्रदेशमध्ये काय आहे, असा प्रश्‍न खासदार इम्तियाज जलील यांनी केला. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औरंगाबाद येथे चित्रपट चित्रीकरणासाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन द्यावे यासाठी निवेदन देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा आणि राजस्थान येथील शेतकरी कृषी विधेयकांच्या विरोधात आंदोलन करित आहेत.

त्यांना दिल्ली येण्यास मज्जाव केला जात आहे. यास कोरोनाचे कारण दिले जात आहे. गर्दी टाळा आणि केंद्र सरकारकडून वेळोवेळी मास्क वापरा, शारीरिक अंतर पाळा आणि हात सतत धुवा असे आवाहन केले जाते. दुसरीकडे केवळ राजकारणासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याकडे दुर्लक्ष करित आहेत का असा प्रश्‍न विचारले असता खासदार जलील म्हणाले, की मी बिहारमध्ये १५ दिवस होतो. आता हैदराबादला महापालिका निवडणुकीसाठी गेलो होतो. भाजपवाल्यांना आपल्या सोयीनुसार निवडणुका हव्या असतात. कोरोना फक्त आपल्यासाठीच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yogi Adityanath Would Met First Maharashtra CM, Said Imtiaz Jaleel