विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, महावितरणवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

यादव शिंदे
Sunday, 27 September 2020

सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२७) घडली.

जरंडी (जि.औरंगाबाद) : शेतात मुख्य वीजपुरवठ्याच्या तारेला चिटकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२७) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जरंडी (ता.सोयगाव) शिवारात चार दिवसांपासून महावितरणच्या शेतपंपाची मुख्य वीजवाहिनीची तार मृत शेतकऱ्याच्या शेतातील मोसंबीच्या झाडावर तुटून पडलेली होती, परंतु शनिवारी (ता.२६) आलेल्या वादळी वाऱ्याच्या झोकात ही वीजतार रात्रीच झाडावरून जमिनीवर पडली.

दहा दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला शेतात

शेतकरी अमोल अशोक पाटील(वय ३५) हा नेहमीप्रमाणे वीजतार झाडावर असल्याचे समजून शेतात काम करित असतानान अचानक वीजतारेला चिटकून जागेवरच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी शिताफीने अमोलला विजतारेच्या कचाट्यातून बाहेर काढले, परंतु चार दिवसांपासून ही तुटलेली वीजतार जोडणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीला कळविले होते.

मात्र महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला. संतप्त शेतकऱ्यांनी मृतदेह तासभर महावितरणच्या सोयगाव कार्यालयासमोर आणला, परंतु पोलिसांनी अखेरीस मध्यस्थी करून शवविच्छेदनासाठी मृतदेह सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी मृत शेतकऱ्याचे मामा जिल्हा बँकेचे माजी संचालक श्रीराम चौधरी यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी फिर्याद दिली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दोन हजार मेंढ्या बचावल्या, तरुणांनी दिला मेंढपाळाला मदतीचा हात

एकुलत्या एक मुलाचा मृत्यू
रात्री उशिरापर्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमोल पाटील यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. अमोल हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. हलगर्जीपणा करणाऱ्या महावितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी व शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे, जमादार संतोष पाईकराव, दिलीप तडवी, संदीप चव्हाण आदी करित आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Farmer Dies Due To Electricity Shock Aurangabad News