मशीनसमोर उभे राहा; कळेल शरीराचे तापमान, मिळतील ग्लोव्हज, मास्क! औरंगाबादकर तरुणाची यशोगाथा

Akashi Joshi
Akashi Joshi

औरंगाबाद : कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्यावर लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. या महामारीवर सध्या कुठलेच औषध नसल्यामुळे सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळणे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे आदींवर भर द्यावा लागत आहे, तसे आवाहनही सातत्याने केले जात आहे. या उपाययोजनांच्या अनुषंगाने काही प्रयोगही होत आहेत. आर्किटेक्ट इंडियाचे आकाश जोशी यांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ‘ऑल इन वन-हायजीन स्टेशन’ तयार केले आहे. या मशीनसमोर उभे राहताच तुम्हाला शरीराचे तापमान कळेल, सोबतच मास्क, ग्लोव्हज मिळतील. विदेशातूनही या ‘स्वच्छता स्टेशन’साठी विचारणा होत आहे.


कोरोना विषाणूची गेल्या सात महिन्यांपासून दहशत आहे. ‘घरीच राहा, सुरक्षित राहा’ असा संदेश देत शासनाने लॉकडाउन जाहीर केले. संसर्ग टाळण्यासाठी एकीकडे लॉकडाउन हाच पर्याय आहे, असे सांगितले जात होते तर दुसरीकडे कोरोनासोबत जगण्याची सवय करावी लागेल, असाही सूर आवळला जात होता. कोरोनासोबत जगायचे कसे तर मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर ही त्रिसूत्री समोर आली. अनलॉकचे टप्पे जाहीर होत असताना ही त्रिसूत्री तंतोतंत पाळणे गरजेचे झाले आहे. त्यासोबत आरोग्याबाबत सजग राहण्यासाठी शरीराच्या तापमानावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या जात आहेत. ही गरज लक्षात घेऊन ‘मेड इन इंडिया’मध्ये समाधान शोधण्यासाठी व्हाइटल डिझाईन्सचे संस्थापक आकाश जोशी स्वित्झर्लंडहून मायदेशी भारतात परतले.

पूर्ण भारतीय बनावटीचे यंत्र
यासंदर्भात आकाश जोशी यांनी सांगितले, ईटीएच ज्यूरिख स्वित्झर्लंडमधून अर्बन डिझाईनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर लॉकडाउन होण्यापूर्वीच भारतात परतण्याचा निर्णय घेतला. स्वच्छतेची आवश्यकता लक्षात घेऊन काँटॅक्टलेस सेंसरवर आधारित मशीन तयार केले. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी तसेच गर्दीचे ठिकाण असलेल्या खासगी, सार्वजनिक संस्था, रुग्णालये, शाळा, सरकारी कार्यालये, हॉटेल्स आदी ठिकाणी हे मशीन उपयोगी ठरणारे आहे. हे उत्पादन पूर्णपणे भारतात तयार केले गेले आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?
हे एक स्टँडअलोन युनिट असून, ज्यात काँटॅक्टलेस सॅनिटायझर, काँटॅक्टलेस टेंपरेचर रीडर, फेस मास्क डिस्पेंसर, हँडग्लोव्हज डिस्पेंसरचा समावेश आहे. मशीनसमोर थांबताच तुम्हाला सेंसरद्वारे सॅनिटायझरसोबत मास्क, हँडग्लोव्हज मिळतात; तसेच शरीराच्या तापमानाची नोंद केली जाते.

वीजेअभावी गॅस निर्मिती प्रकल्प 'स्टॉप' 

विदेशातूनही विचारणा
औरंगाबाद शहरात सध्या सहा ठिकाणी मशीनचा वापर सुरू आहे. मशीनबाबत दिल्ली येथे नेव्हीमधूनही विचारणा झाली आहे. विदेशातूनही विचारणा होत आहे. मशीन कुवेतमध्ये पाठविण्यासाठी सध्या बोलणी सुरू असल्याचे जोशी यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com