सिद्धेश्वर धरणाचे दहा दरवाजे उघडले, धरण शंभर टक्के भरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धेश्वर धरण

धरणाचे आज सकाळी एकूण चौदा दरवाज्यांपैकी दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत

सिद्धेश्वर धरणाचे दहा दरवाजे उघडले, धरण शंभर टक्के भरले

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजता धरणाचे दहा दरवाजे उघडले असून पुर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरण शंभर टक्के क्षमतेने भरले असून पाण्याची आवक बघता गुरुवारी सकाळी धरणाचे दहा दरवाजे उघडून पुर्णा नदीपात्रात ६९६ क्यूसेक्स विसर्ग केला जात आहे.

धरणाचे आज सकाळी एकूण चौदा दरवाज्यांपैकी दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामध्ये एक, दोन, चार, सहा, सात, आठ, नऊ, अकरा, तेरा व चौदा हे दरवाजे उघडून पाण्याचा पुर्णा नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. दरम्यान मागच्या तीन दिवसांपासून पावसाची झड सुरू आहे. कुठे हलका तर कुठे मध्यम पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन देखील झाले नाही. आज भल्यापहाटे पासून पाऊस सुरू आहे. सिद्धेश्वर धरणाच्या लाभ क्षेत्रात देखील चांगला पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे हे धरण शंभर टक्के भरले आहे. पुढील दोन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

हेही वाचा: Marathwada Corona Update: मराठवाड्यात २१० नवे कोरोना रुग्ण, तीन मृत्यू

पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे, कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. पुर्णा नदी, औंढा, वसमत तालुक्यातील काही गावासह परभणी जिल्हाकडे जाते. या पावसाने जिल्ह्यात पिकांना जिवदान मिळाल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. पावसाने वीस ते बावीस दिवसाची ओढ दिली होती यामुळे खरीपाची पिके सुकत होती. आता मात्र या पिकाना दिलासा मिळाला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Web Title: 10 Gates Siddheshwar Dam Opened Alert To Riverside People

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Siddharth Chandekar