...या अद्‌भुत वाद्याचे नाव आहे "सुंदरी' 

संकेत कुलकर्णी
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : भाग्यनगरातील संगीत नवरात्र महोत्सवात सुंदरीवादन करताना कपिल जाधव आणि बलभीम जाधव. तबल्यावर अविनाश बहिरगावकर. औरंगाबाद : "सुंदर वाजते, म्हणून या वाद्याला आजपासून "सुंदरी' हे नाव!'' हे उद्गार आहेत अक्कलकोटचे संस्थानिक राजे फत्तेसिंह भोसले यांचे. त्यांनी सुमारे 100 वर्षांपूर्वी या वाद्याला राजाश्रय दिला. आजही हे वाद्य वाजवणारे एकच कुटुंब सोलापुरात आहे. त्याच कुटुंबातील प्रसिद्ध सुंदरीवादक कपिल जाधव यांचे सादरीकरण शुक्रवारी (ता. चार) औरंगाबादेत झाले. 

असा झाला सुंदरीचा जन्म 

सोलापूरचं त्या काळी नाव होतं सोन्नलागी. या शहराच्या दक्षिणेस असलेल्या आहेरवाडी गावातून आलेल्या पं. बाबूराव जाधव यांनी साधारणतः वर्ष 1922-23 मध्ये या वाद्याचा शोध लावला. त्यासाठी निमित्त ठरले अक्कलकोटचे संस्थानिक महाराज फत्तेसिंह भोसले. अवघ्या 28 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या जाणत्या संस्थानिकाने अक्कलकोटला भव्य राजवाडा आणि शस्त्रास्त्रांचा विलक्षण संग्रह असलेले भव्य शस्त्रागार उभारले. त्यांच्या राज्यारोहणाच्या प्रसंगी आसपासच्या परिसरात कुणी सनईवादक आहे का, याचा शोध केला गेला. त्यावेळी उपजीविकेसाठी सोलापूरला येऊन राहिलेल्या बाबूराव जाधव यांना बोलावलं गेलं; पण सनईपेक्षाही मंजूळ असे वाद्य शोधा, असा आदेश महाराजांनी दिला. सोलापूरच्या गड्डा यात्रेत जाधव यांना लाकडाचे पिपाणीसारखे एक लाकडी खेळणे सापडले. त्यापासून ताडाची पिपाणी जोडून हे वाद्य बनवले. त्याला सहा स्वर होते, त्यात निषाद जोडला आणि हे वाद्य तयार झाले. अक्कलकोट दरबारात त्यांची वाहवा झाली. 

सुंदरीची वैशिष्ट्ये 

खैर किंवा सुपारीच्या लाकडापासून सुंदरी बनवली जाते. त्यात स्टीलची नळी घालून त्या "जिव्हाळ्या'वर ताडाच्या झाडापासून बनवलेली "फुंक' जोडली जाते. त्यातूनच उमटतात सनईपेक्षाही मंजूळ स्वर. 

वादकांची चौथी पिढी 

सोलापूरच्या जाधव परिवारात वादकांची ही चौथी पिढी सध्या कार्यरत आहे. बाबूराव जाधव यांचे सुपुत्र सिद्राम जाधव, तिसऱ्या पिढीत नागनाथ जाधव, मारुती जाधव, हिरालिंग जाधव, भीमण्णा जाधव, बलभीम जाधव आणि आता चौथ्या पिढीत अमोल आणि कपिल जाधव हा वारसा पुढे चालवत आहेत. भाग्यनगर येथे डॉ. श्रीरंग देशपांडे यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या संगीत नवरात्र महोत्सवात शुक्रवारी कपिल जाधव आणि त्यांचे गुरू काका बलभीम जाधव यांचे सुंदरीवादन झाले. हे दुर्मिळ वाद्य ऐकण्यासाठी शहरातील संगीतरसिकांची मोठी गर्दी झाली होती. 

सुंदरी हे वाद्य जितके मधुर, तितकेच दुर्मिळ आहे. आम्ही भारतभर फिरून या वाद्याचा प्रसार करतोय. पण ते आमच्या घरापुरतेच मर्यादित आहे. इतरांनीही हे वाद्य शिकावे, यासाठी माझी तळमळ आहे. 
- कपिल जाधव, सुंदरीवादक, सोलापूर. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 years old music instrument Sundari