बीड जिल्ह्यात रोहयोत ठाण मांडलेल्या सव्वाशेवर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असल्याने या कर्मचाऱ्यांनी हितसंबंधतातून साखळीही निर्माण केली आहे. एकाच वेळी शासकीय कंत्राटी सेवेत आणि दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून काम करणाऱ्यांची मागच्या काळात सेवासमाप्तीही करण्यात आली.

बीड - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कार्यालयांमध्ये अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक व संगणक चालक अशा १२९ जणांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी (ता. २९) काढण्यात आले. तीन दिवसांत नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न झाल्यास सेवा समाप्ती करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

बीड पंचायत समितीमधील अनियमिततेच्या निमित्ताने या मंडळींचे प्रताप चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान, अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असल्याने या कर्मचाऱ्यांनी हितसंबंधतातून साखळीही निर्माण केली आहे. एकाच वेळी शासकीय कंत्राटी सेवेत आणि दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून काम करणाऱ्यांची मागच्या काळात सेवासमाप्तीही करण्यात आली. दरम्यान, सोमवारी ३७ सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, ७० तांत्रिक सहाय्यक आणि २२ संगणक चालकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले.

हेही वाचा - बीड क्राईम - जेवण, दारूस नकार, तलवार कत्तीने हल्ला

जिल्ह्याच्या जिल्हा नरेगा कक्ष, पंचायत समित्या, तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, वनीकरण विभाग याठिकाणी प्रकल्प अधिकारी, कंत्राटी अभियंते आणि संगणक परिचालक यांनी ठाण मांडले होते. अशा सर्वांच्या बदल्या या तालुक्यातून त्या तालुक्यात आणि एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात केलेल्या आहेत. जर तीन दिवसात बदली कर्मचाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला नाही तर त्यांची कंत्राटी सेवा तत्काळ समाप्त करण्यात येईल, असेही बदली आदेशात रेखावार यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 129 officer-employee transfers in beed district