परभणी जिल्ह्यातील १६ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाहीच

गणेश पांडे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

आधार प्रमाणिकरण न केल्यामुळे बसला फटका.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यातील १६ हजार ३३९ शेतकऱ्यांना या कर्ज मुक्ती योजनेचा लाभ घेता आलेला नाही.

परभणी ः राज्य शासनाने लागू केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यातील १६ हजार ३३९ शेतकऱ्यांना या कर्ज मुक्ती योजनेचा लाभ घेता आलेला नाही. केवळ या शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण अद्यापही केलेले नसल्याने त्यांना हा फटका सहन करावा लागला आहे.

परभणी जिल्ह्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत 1 लाख 36 हजार 396 पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 879 कोटी 31 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. राज्य शासनाने ता. 27 डिसेंबर 2019 नुसार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेच्या अनुषंगाने आजपर्यंत बँकामार्फत सदरील योजनेच्या पोर्टलवर याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यात 2 लाख 432 शेतक-यांपैकी 1 लाख 82 हजार 633 लाभार्थ्यांच्या एकूण 5 याद्या प्रसिध्द झाल्या आहेत. प्रसिध्द झालेल्या 1 लाख 82 हजार 633 लाभार्थ्यांपैकी 31 जुलै अखेर 1 लाख 66 हजार 294 लाभार्थ्यांच्या आधाराचे प्रमाणीकरण पूर्ण झालेले आहे. एक लाख 36 हजार 396 लाभार्थ्यांच्या खात्यात 789 कोटी 31 लाख रुपये जमा ही करण्यात आले आहेत.  या कर्जमुक्ती योजनेस पात्र ठरूनही आधार प्रामाणिकर नसल्याने जिल्ह्यातील 16 हजार 339 शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता तातडीने कर्जमुक्ती योजनेसाठी त्यांच्या बॅकांशी संपर्क साधून स्वताचे आधार प्रमाणिकरण करून घ्यावे असे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी कळविले आहे.

हेही  वाचा नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, खरीप हंगाम बहरला

आधार प्रमाणिकरण न करणारे बॅकनिहाय शेतकरी

कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने आधार प्रमाणिकरण करणे सक्तीचे केले होते. परंतू अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे आधार बॅंकेत प्रमाणिकरण करून घेतलेलेच नाही. त्यात भारतीय स्टेट बँकेचे आठ हजार 14, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच हजार 753, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एक हजार 53, बडोदा बँकेचे 620 तर महाराष्ट्र बँकेच्या 609 शेतक-यांचा यात समावेश आहे.

आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक

या योजनेचा लाभ मिळण्याकरिता आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. यादीमध्ये नाव असलेल्या पात्र लाभार्थी शेतक-यांनी 7 ऑगस्ट पुर्वी कुठलाही विलंब न लावता तात्काळ जवळच्या आपले सरकार केंद्र व सी.एस.सी.सेंटर किंवा बँक शाखेत जावून प्रमाणीकरण करून घ्यावे, जेणे करून आधार प्रामाणीकरण पूर्ण केलेल्या शेतक-यांना संबंधीत बँकामार्फत सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही शक्य होईल.

- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी

शब्दांकन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 thousand farmers in Parbhani district are not debt free parbhani news