हिंगोलीत पदवीधरसाठी १६ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

राजेश दारव्हेकर
Monday, 30 November 2020

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडी, भाजपा व मित्रपक्ष, वंचित, यासह ३२ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात आपले भवितव्य अजमावण्यासाठी उतरले आहेत.

हिंगोली : औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची निवडणूक मंगळवारी (ता. एक)  होत असल्याने जवळपास १६ हजार ७६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा देखील सज्ज झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडी, भाजपा व मित्रपक्ष, वंचित, यासह ३२ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात आपले भवितव्य अजमावण्यासाठी उतरले आहेत. मात्र खरी लढत ही तिरंगी होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात पदवीधरासाठी १६ हजार २७६ मतदार असून तालुका निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यात अकरा मतदान केंद्राची संख्या असून एकूण ४४५५ मतदार आहेत.यापैकी पुरुष ३४०५ तर १०५० महिला आहेत असे एकूण ४४५५ मतदार आहेत. तसेच कळमनुरी तालुक्यात आठ मतदान केंद्र असून ,३८०६ मतदार आहेत. यापैकी ३१६१ पुरुष तर ६४५ महिला असे मिळून एकूण ३८०६ मतदार आहेत. सेनगाव तालुक्यात सहा मतदान केंद्र असून यात एकूण १९४९ मतदार आहेत. यापैकी १७४२ पुरुष ,तर २०७ महिला असे एकूण १९४९ मतदार आहेत.याशिवाय वसमत तालुक्यात दहा मतदान केंद्र असून,एकूण ४४१९मतदार आहेत. यापैकी ३४९३  पुरुष, तर ९२६ महिला असे मतदार आहेत. औंढा नागनाथ तालुक्यात चार मतदान केंद्र असून यात एकूण २१३५मतदार आहेत. त्यापैकी १८३० पुरुष  तर ३०५ महिला मतदार आहेत.  जिल्ह्यात एकूण ३९ मतदान केंद्रावर १६ हजार ७६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.तसेच निवडणूकिसाठी १५६ मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष काम पाहणार आहेत.तर निवडणुकी दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ७८ पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच मतदान केंद्रात मतदान सुरळीत होते का नाही याची चाचपणी करण्यासाठी ३९ सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा कौतुकास्पद बातमी : नांदेडचे डाॅ. दीपक शिंदे यांची चंदीगड विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती -

जिल्हास्तरावर अप्पर जिल्हाधिकारी तर तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली आदर्श आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली असून भरारी पथक, व्हिडीओ सनियंत्रण पथक, व्हिडीओ चित्रीकरण तपासणी पथकाची स्थापना केली आहे. तसेच जिल्ह्यात बारा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये हिंगोली तीन, कळमनुरी दोन, सेनगाव तीन, वसमत एक, औंढा नागनाथ एक असे एकूण बारा अधिकाऱ्यांची निवडणुकी साठी नियुक्ती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

ही निवडणूक ब्यालेट पेपर वरती घेण्यात येणार असून, यासाठी जंबो मतपेट्याचा वापर केला जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मतदान केंद्रवार आरोग्य विभागाचे पथक तैनात केले जाणार असून या ठिकाणी मतदारांची तपासणी केली जाणार असल्याचे सांगून या ठिकाणी मास्क, सानिटायझर ,ग्लोव्हज अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. तसेच सामाजिक अंतर पाळत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.

 

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 thousand voters will exercise their voting right for Hingoli graduates hingoli news