आगामी काळात १७ नद्या जीवंत करण्याचे काम केले जाणार ; पाशा पटेल 

गणेश पांडे 
Thursday, 10 December 2020

देशात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण दिवसेदिवस वाढत जात आहे. त्यामुळे मानव जात धोक्यात आली असून या धोक्यातून मानव जातीला बाहेर काढण्यासाठी आपण पृथ्वीरक्षण चळवळ सुरु केल्याची माहिती पाशा पटेल यांनी परभणीत दिली.  

परभणी ः देशात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण दिवसेदिवस वाढत जात आहे. त्यामुळे मानव जात धोक्यात आली असून या धोक्यातून मानव जातीला बाहेर काढण्यासाठी आपण पृथ्वीरक्षण चळवळ सुरु केली आहे. या चळवळीच्या माध्यमातून देशातील लोकांना जास्तीत जास्त ऑक्सीजन पुरविणारी झाडे लावण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. तसेच गोदावरी मांजरा खोरे पूर्नजीवन प्रकल्पही सुरु केला असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात १७ नद्या जीवंत करण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती पाशा पटेल यांनी गुरुवारी (ता.१०) परभणीत दिली.

शेती सेवा ग्रुपच्यावतीने गुरुवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत पाशा पटेल यांनी देशातील ऑक्सीजनच्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. आगामी काही वर्षातच मानसांना घराबाहेर पडतांना पाठीवर ऑक्सीजनचे सिलिंडर लावून निघावे लागेल अशी भिती व्यक्त केली आहे. अमेझॉनच्या जंगलाला लागलेली आगीचे उदाहरण देवून त्यांनी आगामी काळात संपूर्ण जगाला ऑक्सीजनची कमतरता भासणार आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे. 

हेही वाचा - पाणी वाढले तरीही अभयारण्याकडे पाठ फिरवू लागले पक्षी, थंडी वाढली

शेतामध्ये बांबुची शेती करावी 
पुर्वीच्या काळी गाव तेथे वड व पिंपळाची झाडे होती. परंतू ती तोडून टाकण्याचे पाप मानव जातीनेच केले आहे. त्यामुळे ही परिस्थिती ओढावत आहे. आता तातडीने ऑक्सीजनचे सर्वाधिक प्रमाण देणारी झाडे आपल्याला लावावी लागणार आहेत असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांनी सामाजिक व आर्थिक फायद्यासाठी आप - आपल्या शेतामध्ये बांबुची शेती करावी असे आवाहन केले. बांबुची वाढ झपाट्याने होत असते तसेच सर्वाधिक ऑक्सीजन बाहेर फेकून कार्बन शोषून घेण्याचे काम बांबुचे झाड करत असते. तसेच या पिकातून एकरी वर्षाकाठी १ लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न मिळू शकते असे ही ते म्हणाले. 

हेही वाचा - तब्बल तीन लाख ३७ हजार कोरोना चाचण्या, दोन लाख ७७ हजार जण निघाले निगेटिव्ह -

गोदावरी मांजरा खोरे पूर्नजीवन प्रकल्पही सुरु 
देशासह संपूर्ण जगासमोर आलेले हे संकट दुर करण्यासाठी आपण पृथ्वीरक्षण चळवळ हाती घेतली असून त्याद्वारे जनजागृतीचे काम केले जात आहे असेही श्री.पटेल यांनी सांगितले. वृक्षलागवडीसाठी आता शासनाच्या भरवश्यावर बसून चालणार नाही. त्यासाठी स्वतः पुढाकार घेवून वृक्षलागवड केली गेली पाहिजे. गोदावरी मांजरा खोरे पूर्नजीवन प्रकल्पही सुरु केला असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात १७ नद्या जीवंत करण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेस सुधीर बिंदू, रमेश गोळेगावकर, श्री. गंभीरे यांची उपस्थिती होती.

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 rivers will be revived in the near future; Pasha Patel, Parbhani News