Coronavirus : बीडमध्ये लग्न, अंबाजोगाईवर विघ्न!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

 

  • १९ जण क्वारंटाइन
  • दोनवर्षीय बालकाचाही समावेश 

अंबाजोगाई (जि. बीड) - शहरातील एका युवकाचा विवाह सोमवारी (ता. १५) बीड येथील एका युवतीसोबत झाला. काही दिवसांनंतर नवरीच्या नात्यातील बीडमधील रहिवासी असलेले दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे येथील नवरदेवाकडील विवाहाला उपस्थित असलेल्या १९ जणांना अलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यात दोनवर्षीय एका बालकाचाही समावेश आहे. 

सोमवारी येथील एका युवकाचा विवाह बीड येथील एका युवतीसोबत बीडमध्ये साधेपणाने झाला. या शुक्रवारी नवरीकडील नातेवाईक असलेल्या दोघांच्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेणे सुरू झाले. त्यानंतर येथील नवरदेवाकडील संपर्कातील १९ व्यक्तींना शासकीय अलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले. यात एकाच कुटुंबातील ११ जण, एक वाहनचालक व लग्नसमारंभास सहभागी झालेल्या आठ नातेवाइकांचा समावेश आहे. त्यात दोन वर्षांचे एक बाळही आहे. 

कोरोनावर 103 रुपयांची एक गोळी प्रभावी, कंपनीने दिलीय माहिती
 
सोमवारी घेणार स्वॅब 
येथील नागरी रुग्णालयाच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोधमोहीम रात्री पडणाऱ्या पावसामध्येही सुरू होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नातेवाइकांची विचारपूस केली. संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना रात्रीच अलगीकरण कक्षात ठेवण्यात ठेवण्यात आले. सोमवारी (ता. २२) त्यांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. 
 
घाटनांदूरच्या युवकाचेही अलगीकरण 
घाटनांदूर - 
बीड शहरातील छोटा राज गल्ली भागात सोमवारी (ता. १५) झालेल्या विवाह सोहळ्यात येथील एक युवकही सहभागी होता. त्याला आरोग्य विभागाने अंबाजोगाई येथील अलगीकरण कक्षात ठेवले आहे. 
 

माळेगावकर व पोलिस दलाला दिलासा 
माळेगाव (ता. केज) -
येथील महिलेचा उपचारादरम्यान चार दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या संपर्कातील इतरांनाही बाधा असल्याचे समोर आले. त्यांच्या संपर्कातील ३० लोकांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते; तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक व चालकालाही कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले असून, त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात त्यांच्या सुरक्षेनिमित्त पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा त्यांच्याशी संपर्कात आला होता. त्यामुळे या संपर्कातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचाही थ्रोट स्वॅब तपासला. या सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले. श्री. पोद्दार मागचे काही दिवस सेल्फ क्वारंटाइन होऊन काम करत होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 persons quarantined at Ambajogai dest Beed