अबब...! बीड जिल्ह्यात २०० ब्रास वाळूसाठा जप्त, साठेबाजास ठोठावला ५४ लाखांचा दंड 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

आष्टी-नगर हद्दीवरील तालुक्यातील घोंगडेवाडी येथून सीना नदी वाहते. या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूउपसा करण्यात येत आहे. याबाबतची माहिती तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांना मिळाली. त्यांनी पथकासह जाऊन घोंगडेवाडीतील सीनापात्रात छापा टाकला.

आष्टी (जि. बीड) - आष्टी तालुक्यातील घोंगडेवाडी येथे अवैधरीत्या शेतात करण्यात आलेला २०० ब्रास वाळूसाठा तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांनी जप्त केला. याप्रकरणी साठेबाजास सुमारे ५४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

आष्टी-नगर हद्दीवरील तालुक्यातील घोंगडेवाडी येथून सीना नदी वाहते. या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूउपसा करण्यात येत आहे. याबाबतची माहिती तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांना ता.२९ एप्रिल रोजी मिळाली. त्यानुसार त्यांनी दोन मंडलाधिकारी व तलाठी यांच्या पथकासह जाऊन घोंगडेवाडीतील सीनापात्रात छापा टाकला.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

यावेळी पात्रात मोठमोठे खड्डे खोदून वाळूउपसा झाल्याचे दिसून आले. 
दरम्यान, नदीपात्रालगतच शेत सर्व्हे क्रमांक १७४ मध्ये वाळूचा अवैधरीत्या केलेला मोठा साठा पथकाला आढळून आला. पथकाने या ठिकाणी जाऊन पंचनामा केला असता, सुमारे २०० ब्रास वाळू या ठिकाणी अवैधरीत्या साठा करून ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या सर्व साठ्याला सील करून जप्त करण्यात आला. तहसीलदार थेऊरकर यांनी अवैध वाळूसाठा केल्याप्रकरणी शेतमालक अनिल भीमराव माळशिखरे याला सुमारे ५४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

चार महिन्यांपूर्वीचा दंड थकीत 
नदीपात्राशेजारील शेतात २०० ब्रास वाळूचा अवैधरीत्या साठा करणाऱ्‍या अनिल माळशिखरे याच्यावर चार महिन्यांपूर्वीही याच प्रकारची कारवाई करून सुमारे १६ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता; परंतु या दंडाची वसुली अद्याप झालेली नाही. आता पुन्हा त्याला ५४ लाखांचा दंड झाल्याने त्याच्याकडील थकबाकी ७० लाखांच्या घरात गेली आहे. हा दंड वसूल करण्याचे मोठे आव्हान महसूल प्रशासनापुढे आहे. 

आष्टी-नगर हद्दीवरील सीना नदीतून अवैध वाळूउपसा करून वाळूसाठा केल्याप्रकरणी संबंधिताला ५४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वीची थकीत रक्कम व हा दंड अशी सर्व रक्कम तातडीने वसूल करण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्न करणार आहे. 
-नीलिमा थेऊरकर, तहसीलदार, आष्टी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 brass sand stocks seized in Beed district