गोगलगायींनी शेतात पसरविले पाय, प्रशासन करतंय काय?

शेतकरी हवालदिल ः अंबाजोगाई तालुक्यात २,७५० हेक्टर क्षेत्र बाधित, आर्थिक मदतीची गरज
2,750 hectares of soybean affected by snail infestation
2,750 hectares of soybean affected by snail infestation

अंबाजोगाई - तालुक्यात यंदा प्रथमच गोगलगायींच्या प्रादुर्भावाने २,७५० हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यामुळे १२५० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. कृषी विभागाने याबाबत जनजागृती केल्याने १५०० हेक्टर क्षेत्रावरील प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचा दावा केला आहे. याबाबत सकाळने आवाज उठवला, परंतु शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाची भूमिका बघ्याचीच असल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील कुंबेफळ परिसरात प्रथम गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले. याच्या उपाययोजनेच्या माहितीसाठी तालुका कृषी विभागाने तिथे कार्यक्रमही घेतला. त्यानंतर लगेचच जवळगाव, भारज, गित्ता, दस्तगिरवाडी, लिंबगाव, बर्दापूर या भागातही सोयाबीनच्या पिकात गोगलगायींचा प्रादुर्भाव निदर्शनास आला. या भागातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे. त्यानंतरही हा प्रादुर्भाव काही कमी झाला नाही. दुसरे आलेले पीक देखील या प्रादुर्भावात फस्त झाले. संततधार पाऊस सुरूच असल्याने कीटकनाशक टाकूनही प्रभाव पडत नाही. गोगलगायी वेचल्या तर त्यांनी घातलेल्या अंड्यामुळे पुन्हा तीच अवस्था निर्माण होत आहे.

दुबार पेरणी

या गोगलगायींनी उगवलेले सोयाबीनची पिके फस्त केल्याने १२५० हेक्टरवर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र पेरलेले पुन्हा या गोगलगायींनी खाऊन साफ केले. पेरणी काही फुकट होत नाही. उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी दोनदा पेरणी केली, मात्र या नैसर्गिक संकटाने ते हिरावून नेले. आता सरकारनेच या शेतकऱ्यांना तारण्याची गरज आहे.

आमदार मुंदडांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मदतीची मागणी

तालुक्यात गोगलगायींच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. दरम्यान मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांनीही शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

पंचनाम्याबाबत निर्णय नाही

तालुक्यात २७५० हेक्टर क्षेत्र गोगलगायींच्या प्रादुर्भावाने बाधीत होऊनही प्रशासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. जिल्हा स्तरावरील कृषी व महसूल विभागाचे अधिकारी या नुकसानीबाबत का अनभिज्ञ आहेत? त्यांना झालेल्या प्रादुर्भावाची कल्पना नसेल का? जर असेल तर पाहणी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत आदेश का दिले जात नाहीत? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

आपण याबाबत जिल्हा प्रशासनास प्राथमिक माहिती कळविली आहे. कृषी विभागाने प्रचार व प्रसार केला आहे. एक, दोन दिवसांत प्रत्यक्ष बाधीत क्षेत्राची पाहणी करणार आहे.

- विपिन पाटील, तहसीलदार.

दुबार पेरणी करूनही गोगलगायींनी सोयाबीन फस्त केले. हे शेतकऱ्यांचे नुकसान न भरून निघण्यासारखे आहे.

- किरण साळुंके, शेतकरी,जवळगाव.

कृषी विभागाने वेळीच प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांना उपाययोजना करण्यास सांगितले. त्याचबरोबर शेतांत जाऊन उपाययोजनांबाबत प्रात्यक्षिक दाखविले. त्यामुळे १५०० हेक्टरवरील प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे.

- सूर्यकांत वडखेलकर, तालुका कृषी अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com