उमरग्यातील २५ पैकी २२ जणांचा अहवाल निगेटिव्ह

अविनाश काळे
बुधवार, 25 मार्च 2020

सोलापूरला उपचारासाठी पाठविलेल्या एका रुग्णाचा अहवालही निगेटिव्ह आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : येथील उपजिल्हा रुग्णालयात परदेशातून व इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. उमरगा तालुक्यात एकूण २५ पैकी २२ जणांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर २४ व २५ मार्चदरम्यान तपासणीसाठी आलेल्या तिघांच्या स्वॅबचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.

दरम्यान, रविवारी (ता. २२) दाखल झालेल्या एका व्यक्तीची प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्याने सुरक्षितरीत्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयात रविवारी दाखल झालेल्या एका व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता असल्याने रुग्णालय प्रशासनाने त्याला सोमवारी सायंकाळी सोलापूरला हलविले होते. सदर व्यक्तीला दुसऱ्या आजाराने ग्रासल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा - अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिरातील दर्शन बंद, फक्त पुजाऱ्यांना प्रवेश

२० मार्च ते २५ मार्च यादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात २५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील आईसीएमआर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था यांच्याकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणखी तीनजणांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. दरम्यान, अहवाल निगेटिव्ह येत असल्याने भीतीचा थरकाप थोडा कमी होत असला तरी खबरदारी घेण्याचे दिवस आणखी मोजावे लागणार आहेत. सर्वांनी संचारबंदीचे पालन करून घरी थांबणे हिताचे राहणार आहे. 

 

स्वॅब घेतलेल्या एका व्यक्तीला दमा असल्याने अचानक परिस्थिती गंभीर होऊ शकते. रुग्णालयात फिजिशियन नाहीत. त्यामुळे धोका पत्करण्यापेक्षा त्या व्यक्तीस सोलापूरला हलविण्यात आले आहे. त्या व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आहे. त्यामुळे तो कोरोनाग्रस्त आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही. लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःच्या काळजीकडे लक्ष द्यावे. 
- डॉ. पंडित पुरी, वैद्यकीय अधीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 out of 5 people report negative