Latur : महापालिकेत ३१ कर्मचारी आता सेवेत कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

latur

महापालिकेत ३१ कर्मचारी आता सेवेत कायम

लातूर : मागील अनेक वर्षांपासून मानधन तत्त्वावर महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या ३१ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या प्रयत्नांतून शासनाने महापालिकेच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत. यामुळे तीन डॉक्टर्स, २५ परिचारिका आणि तीन संगणक परिचालकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज दोन अंतर्गत हे कर्मचारी मागील १६ वर्षांपासून ठरावीक मानधनावर महापालिकेच्या सेवेत काम करत होते. शासनाच्या धोरणानुसार जाहिराती देऊन तसेच मुलाखती घेऊनच या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या होत्या. शासकीय निकषानुसार या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याचा ठराव महानगरपालिकेने मंजूर केला होता. कोविड काळात अतुलनीय कामगिरी बजावत लातूरकरांची सेवा बजावल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या वतीने या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलेला होता.

पालकमंत्री अमित देशमुख यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा करून तो मंजूर करून घेतला. यासंदर्भात राज्य शासनाच्या उपसचिवांकडून महापालिकेला अवगत करण्यात आले आहे. महापालिकेत मानधन तत्त्वावर कार्यरत तीन डॉक्टर्स, २५ परिचारिका आणि तीन संगणक परिचालक शासनाच्या या निर्णयामुळे सेवेत कायम होणार आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याचा निर्णय राज्य शासनाकडून करून घेतल्याबद्दल महापौर गोजमगुंडे व उपमहापौर बिराजदार यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

loading image
go to top