अबब...चोरीच्या 32 मोटारसायकल पाथरीतून जप्त

गणेश पांडे
Friday, 22 January 2021

परभणी शहरातील इदगाह मैदानाजवळ काही इसम चोरीची मोटारसायकल घेवून येत असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांच्या विशेष पथकाने या ठिकाणी सापळा लावला होता.

परभणी ः वेगवेगळ्या जिल्ह्यातून चोरी झालेल्या तब्बल 32 मोटारसायकल पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी (ता. 21) जप्त केल्या. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परभणी पोलिसांची मोटारसायकल चोरी प्रकरणातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

परभणी शहरातील इदगाह मैदानाजवळ काही इसम चोरीची मोटारसायकल घेवून येत असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांच्या विशेष पथकाने या ठिकाणी सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार दोन मोटारसायकल व चार इसम त्या ठिकाणी आले. शारदा महाविद्यालयाच्या पाठीमागील भिंतीच्या जवळ जावून हे इसम थांबले होते. त्यावेळी पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिताफीने या चारही इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोटारसायकल जप्त केल्या. अटक करण्यात आलेल्या इसमामध्ये महादेव दिलीप घोगरे (वय 19), विशाल रमेश इंगळे (वय 21), शाम नामदेव हरकळ (वय 21, सर्व रा.रेनाखळी ता.पाथरी) व कैलास बाबासाहेब शेळके (वय 20, रा. उमरा ता.पाथरी) असे आहेत.

हेही वाचा नांदेडमध्ये संतापजनक घटना : सालगड्याने अत्याचार करुन केला बालिकेचा खून

या चारही जणांची चौकशी केली असता त्यांनी अजूनही मोटारसायकल चोरी केल्या असल्याचे समोर आले. चोरी केलेल्या 32 मोटारसायकल या शाम हरकळ (रा. रेनाखळी ता.पाथरी) याच्या शेतात लपून ठेवल्याचे सांगितले. या सर्व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई परिविक्षाधिन पोलिस उपाधिक्षक बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विश्वास खोले, चंद्रकांत पवार, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीरोद्दीन फारुखी, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, अजहर पटेल, राहूल चिंचाणे, बालाजी रेड्डी, दीपक मुदीराज, विष्णू भिसे, समीर पठाण, अरूण कांबळे यांनी केली.

पर जिल्ह्यातील मोटारसायकलची चोरी

ही चार जणांची टोळी केवळ जिल्ह्यातच चोरी करत नव्हती तर ती पर जिल्ह्यात जालना, बीड, नांदेड, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करून रेनाखळी (ता.पाथरी) येथे आणत असल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे.

चोरीच्या मिळालेल्या मोटार सायकल आरोपींनी कुठून चोरल्या. कोण कोणत्या जिल्ह्यात गुन्ह्यांची नोंद आहे. याचा शोध घेणे सुरु आहे. आरोपींनी अजून काही गुन्हे केले आहेत का याची चौकशी सुरु असून ते लवकर समोर येईल.

- जयंतकुमार मीना, पोलिस अधिक्षक, परभणी

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 stolen motorcycles seized from Pathari parbhani news