esakal | सहा कारखान्यांकडे ३४ कोटी थकीत ; शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जातेय नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

marathwada

सहा कारखान्यांकडे ३४ कोटी थकीत ; शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जातेय नाराजी

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांकडे ३४ कोटी ६९ लाख रुपये एफआरपी प्रमाणे थकीत आहेत. यंदा ११ कारखान्यांनी गाळपासाठी परवानगी मागितली असून, तसे प्रस्ताव साखर आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहेत. पावसामुळे उसाचा हंगाम काही दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे. साधारणतः पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामाला आता दिवाळी उजाडेल असे सांगितले जात आहे.

यंदा उसाचे क्षेत्र गेल्यावर्षीपेक्षा अधिक वाढलेले आहे. ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र असल्याने हंगाम लवकर सुरू करण्याचे नियोजन कारखान्याचे होते. पण, सातत्याने पडलेल्या पावसामुळे उसाच्या शेतात अद्यापही पाणी आहे. साधारणतः दरवर्षी दिवाळीनंतरच ऊस तोडणीला वेग येत असतो. यंदाही दिवाळीतच ऊस तोडणीला सुरवात होणार असल्याने हंगाम अधिक दिवस राहण्याची शक्यता आहे. .

हेही वाचा: Ahmednagar : भरती प्रक्रिया पारदर्शक असेल

गतवर्षीचा विचार केला तर ११ कारखान्यांनी एक हजार ८०० ते दोन हजारांचा तर एका कारखान्याने दोन हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर उसाला दिल्याचे दिसून येत आहे. यातील सहा कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिलेली नाही. यामध्ये नावजलेल्या कारखान्यांची नावे असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कारखान्यांकडे थकीत रक्कमेची शासन स्तरावरूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नेमकी दाद मागायची कोठे? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. असे असतानाच यंदा केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याची शिफारस केल्याने अडचणीत वाढ होणार असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे

‘व्याजाची वसुली करा’

एफआरपीच्या कायद्यानुसार ऊस गाळप केल्यापासून १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणे बंधनकारक आहे. अन्यथा कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या रक्कमेवर व्याज देण्याची तरतूद आहे. त्यामुळे एफआरपी प्रमाणे रक्कम न देणाऱ्या कारखान्यांकडून शासनाने आता व्याजाची वसुली करावी, अशी मागणी होत आहे.

loading image
go to top