esakal | Latur : आयुक्तांच्या आदेशानंतर लातुरात ३४ दुकाने सील
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्तांच्या आदेशानंतर लातुरात ३४ दुकाने सील

आयुक्तांच्या आदेशानंतर लातुरात ३४ दुकाने सील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी आयुक्त अमन मित्तल यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या पथकाने बुधवारी (ता. सहा) येथील जुना रेणापूर नाका परिसरात ३४ दुकाने सील केली आहेत. सकाळी अकरा वाजल्यापासून ही कारवाई सुरु होती. दुकाने सील होत असल्याने बघ्यांनीही गर्दी केली होती.

येथील जुना रेणापूर नाका परिसरात टाकेनगर भागात गेल्या काही वर्षांपासून अनेक दुकाने थाटण्यात आली होती. तेथे व्यवसायही सुरु होते. अनधिकृतपणे ही दुकाने थाटण्यात आली होती. या संदर्भात महापालिकेत काही तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आयुक्त अमन मित्तल यांनी गेल्या महिन्यात सुनावणीही घेतली होती. टाकेनगर येथील जमीन सर्वे २२५ सिटी सर्वे नं. ९९२८ येथे एकूण ३४ दुकाने व इमारतीचे बांधकाम परवानगी न घेता केल्याचे निष्पन्न झाले होते. सदरील अनधिकृत बांधकाम नियमबाह्य सामासिक अंतर न सोडता बांधल्याचे सिद्ध झाले होते. सदरील मालमत्ताधारकांना आपले अनधिकृत बांधकाम नियमित करून घेणेबाबत १५ दिवसांचा अवधीही आयुक्त मित्तल यांनी दिला होता. .

हेही वाचा: वैजापूर तालुक्यात एसटी-दुचाकीचा भीषण अपघात, तिघे ठार

पण, दिलेली मुदत संपूनही नियमितीकरणाचा प्रस्ताव या मालमत्ताधारकांनी महानगरपालिकेकडे सादर केला नव्हता. त्यामुळे या टाकेनगर भागातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेली ३४ दुकाने सील करण्याचे आदेश आयुक्त अमन मित्तल यांनी दिले होते. त्यानंतर महापालिकेचे क्षेत्रिय अधिकारी बंडू किसवे, अभियंता गणेश देवणीकर, तहेमीद शेख, किशोर पवार, रवी कांबळे, अमजद शेख, हिरा कांबळे, पद्माकर गायकवाड, तय्यबअली शेख, आर. बी. बनसोडे, अमित लामतूरे, प्रवीण शिंदे, एस. टी. नागराळे, गोविंद रोंगे, संतोष कुरकूट यांचे पथक सकाळी अकरा वाजताच टाकेनगर भागात दाखल झाले होते. सकाळपासूनच सुरू झालेली कारवाई दुपारपर्यंत सुरु होती

महापालिकेचे परवानगी न घेता दुकाने उभारण्यात आली होती. या संदर्भात संबंधितांना नोटीसही देण्यात आली होती. त्यानंतर सुनावणी घेण्यात आली. त्यानंतरही संबंधितांनी बांधकाम नियमित करून घेण्याबाबत प्रस्ताव महापालिकेला सादर केला नाही. त्यामुळे सदरील दुकाने सील करण्यात आली आहेत.

-अमन मित्तल,

आयुक्त, महापालिका.

loading image
go to top