३८ हजार लाभार्थींनी घेतला शिवभोजनाचा लाभ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजना गरजूंसाठी वरदान ठरली आहे. जिल्‍ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १६) ३८ हजार ६२५ लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 

हिंगोली : कोराना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन सुरू आहे. यामुळे गरजूंच्या उरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन योजना गरजूंसाठी वरदान ठरली आहे. जिल्‍ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १६) ३८ हजार ६२५ लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

जास्‍तीत जास्‍त लाभार्थींना शिवभोजन मिळावे, यासाठी जिल्‍हाधिकरी रुचेश जयवंशी यांनी पुढाकार घेतला आहे. त्‍यामुळे लाभार्थींना त्‍यांच्या घरपोचदेखील शिवभोजनचे वाटप केले जात असल्याचे केंद्रचालक चंदर यादव यांनी सांगितले. 

हेही वाचाहिंगोलीकरांना दिलासा; कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल आला निगेटीव्ह

१३ हजार १७६ थाळींचे वाटप

हिंगोली शहरात साई माऊली सेवाभावी संस्‍थेंतर्गत सुरू असलेल्या शिवभोजन योजनेत १३ हजार १७६ थाळींचे वाटप करण्यात आले आहे. तसेच शहरातील प्रकाश भोजनालायास दररोज शंभर प्रमाणे पाच हजार ५१५, तर कोथळज रोड भागातील साई भोजनालयाने दररोज शंभर प्रमाणे सहा ३०३ थाळींचे वाटप केले आहे. 

जिल्‍हा प्रशासनातर्फे माहिती

तर कळमनुरी येथील प्रकाश भोजनालयास ७५ मंजूर थाळींतून दोन हजार ४७३ थाळींचे वाटप झाले आहे. सेनगाव येथील पृथ्वीराज हॉटेलकडे १५० प्रमाणे दोन हजार १७८ थाळी, वसमत येथील राधाई मेसकडे १५० प्रमाणे दोन हजार ६५९ थाळी, तर औंढा नागनाथ येथील व्यंकटेश रेस्‍टॅारंटकडे असलेल्या ७५ थाळींप्रमाणे दोन हजार ४८०, असे आतापर्यंत एकूण ३८ हजार ६२५ थाळींचे वाटप झाल्याची माहिती जिल्‍हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

थाळीचा पाच रुपये दर

 लॉकडाउन सुरू असल्याने शासकीय व खासगी रुग्णालयात असलेले विविध आजाराचे रुग्ण, त्‍यांचे नातेवाईक यासह बाहेरगावांतून आलेले काही नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. शासनाने त्‍याचा दर पाच रुपये केल्याने या योजनाचा चांगलाच लाभ गरजूंना होत आहे. 

गरजूंना घरोघरी वाटप

केंद्र चालकदेखील गरजूंना घरपोच वाटप करीत आहेत. शहरातील साई माऊली शिव भोजन यांच्यातर्फें गरजूंना घरोघरी तसेच जिल्‍हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरातदेखील वाटप केले जात असल्याचे चालक एकनाथ भारती यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप

सेनगाव : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील शिल्लक राहिलेले धान्य तालुक्यातील ४० शाळांतून विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सचे पालन करीत गुरुवारी (ता. १६) वाटप करण्यात आले.
राज्यातील कोरोना संसर्ग आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता.

येथे क्लिक कराव्हिडिओ: लघू, शेतीवर आधारित उद्योग सुरू व्हावेत: आनंद निलावार

 शिल्लक राहिलेले धान्य 

 ग्रामीण भागातील शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शालेय पोषण आहाराचे धान्य शिल्लक राहिले होते. त्यामध्ये तांदूळ, डाळी, कडधान्ये यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने आहार देणे आवश्यक असल्याने शिक्षण विभागाने शिल्लक राहिलेले धान्य संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना 

त्यानुसार पंचायत समिती गटशिक्षण विभागाने शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांना धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्‍याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ४० शाळेत शिल्लक राहिलेले धान्य संबंधित विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्याची माहिती गटशिक्षण विभागाने दिली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 38 thousand beneficiaries took advantage of Shiva meal Hingoli news