
‘सकाळ’च्या वृत्तानंतर दानशुर सरसावले आहेत. धनंजय मुंडे यांनी काहीही अडचण आल्यास सांगण्याचे आवाहन केले आहे.
बीड : मध्यवर्गीय वनवे कुटूंबातील चारही बहिणी आता डॉक्टर होणार आहेत. दोघींचे शिक्षण सुरु असून दोघींच्या एमबीबीएस प्रवेशासाठी शुल्काची आलेली अडचणही दुर झाली आहे. ’सकाळ’च्या वृत्तानंतर दानशुर सरसावले असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही या भगीनींच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देऊ केला आहे.
रोहतवाडी (ता. पाटोदा) येथील संगीता व प्रभाकर या दाम्पत्याला चारही मुलीच असून नोकरी गेल्यानंतर शेती व घरगुती व्यवसाय करुन हे दाम्पत्य मुलींना शिकवत आहे. मुलींनीही आई - वडिलांच्या कष्टाचे चीज केले. पहिली मुलगी प्रतिक्षा दंतवैद्यक (बीडीएस) शाखेत शेवटच्या वर्षात शिकत असून दुसरी मुलगी प्रिती देखील एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिकत आहे.
शरद पवारांच्या धाडसी निर्णयामुळेच भूकंपग्रस्त ५२ गावांना हक्काचे, पक्के घरे मिळाली
विशेष म्हणजे त्यांच्या शेवटच्या जुळ्या निकीता व प्रणिता यांनीही यंदाच्या वैद्यकीय पूर्व परीक्षेत चांगले गुण मिळविले. प्रणिताला नीट परीक्षेत ५२७ गुण मिळाले आणि तीचा एसएसपीएम मेडिकल कॉलेज कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे एमबीबीएससाठी प्रवेश निश्चित झाला. तर, निकीतानेही नीट परीक्षेत ५४० गुण मिळवून पुणे येथील काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिक्षणासाठी प्रवेशासाठी पात्र ठरली. मात्र, सामान्य वनवे कुटूंबियांना पहिल्या दोन मुलींच्या शिक्षणासाठीच पाच एकरांतील तीन एकर जमिन विकावी लागली. आता दोन एकरांत गुजराण आणि पहिल्या दोन मुलींचे शिक्षण आणि दुसऱ्या दोघींचा एमबीबीएस प्रवेश असे संकट त्यांच्यासमोर उभारले.
दोघींचे १६ लाख रुपये शुल्क भरल्यानंतर त्यांचे प्रवेश निश्चित होणार आहेत. नातेवाईक, दानशुर, मित्रपरिवार आणि स्वत: असे त्यांनी दहा लाख रुपयांची जुळवाजुळवही केली. पण, उर्वरित सहा लाख रुपयांसाठी धडपड सुरु होती. वेळेत पैसे जमा झाले नाहीत तर या दोघींचे एमबीबीएस होण्याचे स्वप्नही अधुरे राहणार होते. दरम्यान याबाबत ‘सकाळ’मधून ता. २८ नोव्हेंबरच्या अंकात ‘चौघी बहिणी होणार डॉक्टर; पण परिस्थितीचा अडथळा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. मुलींची हुशारी, कुटूंबाची परिस्थिती आणि आता समोर आलेली अडचण यातून मांडल्यानंतर संवेदनशिल समाजातील दानशुरांनी मदतीचा हात पुढे केला. पाहता पाहता या कुटूंबियांना मोठी मदत झाली. शनिवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बोलावून घेत ‘मुलींच्या शिक्षणातील काहीही अडचण सांगा, केव्हाही मागा, मी करतो’ असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे वनवे दाम्पत्य आणि चार बहिणींचे डॉक्टर होण्याच्या स्वप्नातला अडसर दुर झाला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
‘सकाळ’च्या वृत्तानंतर तीन लाखांवर मदत-
दरम्यान, ‘सकाळ’च्या वृत्तानंतर या हुशार मुलींच्या एमबीबीएस प्रवेशासाठी अनेक दानशुरांनी मदत केली. यातून आतापर्यंत तीन लाख १० हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून धनंजय मुंडे यांनीही मदत देऊ केली आहे. यामध्ये खटोड प्रतिष्ठान, प्रमिला व्यास, मयुर बडेरा, संतोष गोकुर्ला, प्रकाश काकड, सिमा जोशी, स्नेहल नर्सरी, दिनकर राजाराम, रविंद्र बडे, लक्ष्मण गित्ते, संजय नागरगोजे, एक दिवस समाजासाठी अभियान, सतीश बडे, दत्तात्रय लटपटे, सौरभ वाघ, लक्ष्मण कोठुळे, श्रीमती सांगळे, आरती आंधळे, कैलास तांदळे यांचा मदत करणाऱ्यांत समावेश आहे.
(edited by- pramod sarawale)