शरद पवारांच्या धाडसी निर्णयामुळेच भूकंपग्रस्त ५२ गावांना हक्काचे, पक्के घरे मिळाली

विश्वनाथ गुंजोटे
Saturday, 12 December 2020

३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपात भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देश-विदेशातून मदत एकवटली. त्यामुळे हा भाग पुन्हा जोमाने उभा राहिला याला प्रोत्साहित व धैर्य देण्यामागे तत्कालीन मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे.

Powerat80 किल्लारी (जि.लातूर)  :  ३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपात भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देश-विदेशातून मदत एकवटली. त्यामुळे हा भाग पुन्हा जोमाने उभा राहिला याला प्रोत्साहित व धैर्य देण्यामागे तत्कालीन मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. म्हणूनच भूकंपग्रस्तांचा तत्पर सेवेकरी, जाणता राजा या उपाधीने त्यांना ओळखले जाते. भूकंप झाल्यादिनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सकाळी सात वाजता हेलिकाॕप्टरने या भागात ते पोचले. रावसाहेब पाटील यांच्या गढी परिसरात फिरुन नागरिकांच्या व्यथा ऐकुन घेतल्या.

उद्ध्वस्त झालेले घरे, नागरिकांच्या किंकाळ्या, रडुन होत असलेला आक्रोश, अस्ताव्यस्त अवस्था पाहुन ते थक्क झाले. ते गावात येताच देवाची अर्चना करणाऱ्या जिवाला जिवात जीव आला. प्रथम नागरिकांशी संवाद साधून गाव प्रमुखांसोबत चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. पक्के बांधकामे कमी असल्याने सर्वच्या सर्व घरे उद्ध्वस्त झाली होती. संसार उद्ध्वस्त झाले होते.  खाण्यापिण्याचे वांदे झालेले होते. अशामध्ये त्यांनी तात्पुरता निवारा, तंबू पत्र्याचे शेड खाण्यापिण्याच्या व्यवस्थेचे आदेश देण्यात आले. या भागातील जनतेला कुठल्याही प्रकारच्या असुविधा होऊ नये. याची काळजी घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना  त्यांनी पोचण्यापूर्वीच दिले होते.

संपुर्ण भूकंपग्रस्त भागाच्या विकासाच्या दृट्टीने जो विकास आराखडा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी केला. तो खरोखर कौतुकास्पद होता. किल्लारीसह परिसरातील गावांच्या पुनर्रचनेसाठी सर्व सरंपच एकत्र येऊन आपणास ज्या पद्धतीने गावची रचना करायची आहे. तसा आराखडा मागवून घेऊन त्यात सुधारणा करुन तो स्वीकारण्यात आला होता. शरद पवार यांच्या या धाडसी निर्णयामुळेच आज भूकंपग्रस्त बावन्न गावांना हक्काचे आणि पक्के घरे मिळाली. आज अनेकांचे संसार गुण्यागोविंदाने चालत आहेत. या भागातील भूकंपग्रस्त गावांमध्ये त्यांचा मोठा सत्कारही करण्यात आला होता. असे असले तरी त्यांनी केलेल्या कार्याची उतराई करणे अशक्य असल्याची भावना भुकंपग्रस्तातून व्यक्त केले जाते.
 

 

 

भूकंप दिवशी शरद पवारांना पाहताच माझ्या डोळ्यातून अश्रू आले. देव आपल्या गावात आल्यासारखे मला वाटले. उत्सुकतेने त्यांनी माझी माझ्या, गावची चौकशी केली. गावात आरोग्य व्यवस्था, निवारा, नागरिकांच्या सुरक्षेसाठी, मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांचे प्रेत बाहेर काढण्यासाठी आदेश दिले. हजारो कर्मचारी तात्काळ कामाला लागले. त्यांच्या या धाडसाने मी भारावून गेलो. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
- डॉ. शंकरराव पडसाळगे, तत्कालीन सरपंच किल्लारी  
 

पवार साहेबांच्या आदेशाने भारतीय सैनिक दलाचे जवान आरोग्य खात्याचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासह जीवनावश्यक वस्तू दूध, खाद्यपदार्थ, राॕकेल, जळन, इंधन अशा प्रकारच्या वस्तु संध्याकाळपर्यंत याठिकाणी पोच झाल्या होत्या. बाहेरगावाहून आलेल्या गावच्या नागरिकांसाठी पासेचची सोय लगेच केली गेली.त्यांच्यामुळेच मूळ रहिवाशांना गावात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली पवार साहेबांचे खुपखुप आभार आहे.
- भरत सगर, ग्रामस्थ, किल्लारी

 

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar Decision Earthquak Hit People Get Pakka Houses