एकापाठोपाठ सुमारे 45 सिलेंडरचे स्फोट

जगदीश कुलकर्णी
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने सुमारे 45 सिलेंडरचे स्फोट झाल्याची दुर्घटना तुळजापूर-सोलापूर मार्गावर मंगळवारी (ता. 11) रात्री पावणेसातच्या सुमारास घडली.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने एकापाठोपाठ सुमारे 45 सिलेंडरचा स्फोट झाला. तुळजापूर-सोलापूर रस्त्यावरील तामलवाडी (ता. तुळजापूर) गावानजीक मंगळवारी (ता. 11) रात्री पावणेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

अवघ्या काही मिनिटांत दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आटोकाट प्रयत्न करीत रात्री आठपर्यंत आग आटोक्‍यात आणली. दरम्यान, स्फोटाच्या आवाजामुळे नागरिक भयभित झाले आहेत. परिसरातील अनेकांनी स्फोटाचे आवाज येताच सुरक्षीत ठिकाणी धाव घेतली. 

मोठी बातमी - मुलं आणि महिलांच्या तस्करीबाबतचं धक्कादायक वास्तव, मुंबई एक नंबरवर तर पुणे...
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरहून 340 सिलेंडर घेऊन एक ट्रक तुळजापूरकडे निघाला होता. तामलवाडीपासून जवळच असलेल्या गंजेवाडी (ता. तुळजापूर) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असताना हा ट्रक उलटला. त्यानंतर ट्रकमधील सिलेंडरचे स्फोट झाले. एकामागून एक सिलेंडरचे स्फोट होत असल्याने नागरिकांत प्रचंड घबराट निर्माण झाल्याने अनेकांनी सुरक्षीत ठिकाणी धाव घेतली. अवघ्या काही मिनिटांत स्फोटामुळे सुमारे 18 ते 20 सिलेंडर उडून परिसरात पडले. त्यामुळे पेटते सिलेंडर पडलेल्या ठिकाणीही आग लागली. 

मोठी बातमी -  ते प्रवासी पीत होते ट्रेनच्या टॉयलेटमध्ये भरलेलं पाणी..

पोलिसांकडून हायअलर्ट जारी 
उडणारे आगीचे लोट पाहून काही नागरिकांनी तामलवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने माहिती देत सोलापूर, तुळजापूरसह चार ठिकाणच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तसेच नागरिकांना रस्त्यावर, तसेच घटनास्थळापासून जवळच्या अंतरावर फिरू नये अशा सूचना देत हायअलर्ट जारी करण्यात आले. अग्निशमक दल अवघ्या काही मिनिटांत दाखल झाल्यानंतर आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, तामलवाडी भागातील नागरिक गॅस सिलेंडरच्या आवाजाने भयभीत झाले होते. सिलेंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज अन्‌ उडणाऱ्या आगीच्या ज्वाला पाहून नागरिकांत प्रचंड घबराट निर्माण झाली होती. स्फोटाच्या मोठ्या आवाजाने तामलवाडीतील अनेक नागरिकांच्या घरातील भांडेही पडले. साधारणपणे रात्री आठपर्यंत तब्बल 45 सिलेंडरचे स्फोट झाले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. तर प्रशासनाच्या सूत्राने 12 ते 15 पंधरा सिलेंडरचे स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. 
दरम्यान, पोलिस विभागाने खबरदारीची उपाययोजना म्हणून तुळजापूर-सोलापूर महामार्गावरील वाहतूक तातडीने बंद केली होती. तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिप्परसे, पोलिस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे घटनास्थळी दाखल झाले. 

माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो. या घटनेत जिवीतहानी झालेली नाही. दहा ते बाराहून अधिक गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. पेटत्या गॅस सिलेंडरवर उशीरापर्यंत पाण्याचा मारा सुरू होता. आग आटोक्‍यात आल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास सोलापूर-तुळजापूर मार्गावरील वाहतुक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले. 
- सौदागर तांदळे, तहसीलदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 45 cylinder explosions