Corona Update : परभणीत ६० वर्षीय व्यक्ती काल पॉझिटिव्ह, आज मृत्यू 

गणेश पांडे
Saturday, 30 May 2020

मुंबईहून आलेल्या ६० वर्षिय व्यक्तीवर परभणीत जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु शनिवारी पहाटे या व्यक्तीचा मृत्यू झाला.

परभणी : कोरोना विषाणूची बाधा झालेल्या एका ६० वर्षीय व्यक्तीचा शनिवारी (ता. ३० मे) पहाटे मृत्यू झाला. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा हा दुसरा बळी आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. आज घडीला जिल्ह्यात कोरोना चे ७४ रुग्ण आहेत. शुक्रवारी (ता. २९) जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात कोरोना संकर्मीत सात रुग्ण आढळून आले होते. त्यात वाघी बोबडे (ता. जिंतूर) येथील एका ६० वर्षीय व्यक्तीचा समावेश होता. या व्यक्तीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु शनिवारी पहाटे या व्यक्तीचा मृत्यू झाला. 

हेही वाचा - Parbhani Breaking ; सहा पॉझिटिव्ह रुग्णांची पडली भर, रुग्ण संख्या ७५ 
 

कोरोना बाधित रुगणाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात हा कोरोनाचा दुसरा बळी आहे. यापूर्वी जिंतूर तालुक्यातीलच एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, या मृत रुग्णावर महापालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी दिली.

मृत झालेला व्यक्ती हा परभणी जिल्ह्यात मुंबई येथील पनवेलमधून वाघी बोबडे येथे कुटुंबियासह १५ मे रोजी आला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला बुधवारी (ता.२७) परभणीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू, त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

परभणी कोरोना मिटर

  • एकूण रुग्ण - ७४
  • उपचार सुरु - ७१
  • घरी सोडले - एक
  • मृत्यु - दोन

आयुक्तांनी घेतला प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा
महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी गुरुवारी (ता. २८) सर्व विभागप्रमुख, डॉक्टर यांच्या सोबत कोरोनाचा प्रतिबंध, उपाययोजना व आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. दरम्यान, त्यांनी शहरातील विविध ठिकाणच्या विलगीकरण केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. महापालिकेत झालेल्या या बैठकीत आयुक्त श्री. पवार यांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवलेल्या संशयित रुग्णांच्या सुविधांचा आढावा घेऊन तेथे प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. 

येथे क्लिक कराच - मराठवाड्याच्या भुमिपुत्राकडून परभणीला मोठ्या अपेक्षा
 

या इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची, सांडपाणी, स्वच्छता, सॅनिटायझर व्यवस्थेकडे कटाक्षाने लक्ष देण्यास सांगितले. सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक, संतोष वाघमारे, सुधाकर किंगरे, अल्केश देशमुख, मुंतजिबखान, करण गायकवाड यांची त्या ठिकाणी नेमणूक केली. होम क्वारंटाइन केल्यानंतर नागरिक फिरू शकतात, त्यांनी घरात राहावे यासाठी त्या परिसरात सहायक आयुक्त, आरोग्य विभागातील कमर्चाऱ्यांनी भेटी द्याव्यात. शहरातील मुख्य चेकपोस्ट गंगाखेड रोड, पाथरी रोड, वसमत रोड या ठिकाणी बाहेरगावांहून येणाऱ्यांची माहिती घेण्याच्या सूचना केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 60-Year-Old Man In Parbhani Tested Positive Yesterday And Died Today