
लातूर जिल्ह्यात पहिल्यापासूनच पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाळ्याचे चार महिने संपले आहेत. एकही मोठा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. याचा परिणाम म्हणून नदी-नाले तर कोरडेच आहेत; पण पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचे असलेले सर्वच प्रकल्पही कोरडे आहेत.
लातूर ः लातूर जिल्ह्यात पहिल्यापासूनच पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाळ्याचे चार महिने संपले आहेत. एकही मोठा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. याचा परिणाम म्हणून नदी-नाले तर कोरडेच आहेत; पण पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचे असलेले सर्वच प्रकल्पही कोरडे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन पडत असल्याने परतीच्या पावसाच्या आशाही मावळल्या आहेत. त्यामुळे यावर्षी जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी जूनमध्ये थोडासा पाऊस झाला; पण त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरविली. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे चार महिने संपले आहेत. या चार महिन्यांत एकही जोरदार पाऊस झाला नाही. अहमदपूर आणि चाकूर तालुक्यांत इतर तालुक्यांच्या तुलनेत बरा पाऊस झाला आहे; पण इतर तालुक्यांची अवस्था मात्र बिकट आहे. अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे वाळून जात असलेल्या खरीप पिकांना थोडे जीवदान मिळाले आहे; पण उत्पन्नात मात्र घट होणार आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
जिल्ह्यात मोठे पाऊस झाले नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना पाणीच आलेले नाही. जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली मांजरा नदी कोरडी आहे. इतर नद्या आणि नाल्यांची तीच अवस्था आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रकल्पही कोरडे आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 505.22 मिलिमीटर पाऊस झाला आहे. लातूर तालुका 351.08, औसा 363.99, रेणापूर 515.63, उदगीर 461.43, अहमदपूर 734.84, चाकूर 511.80, जळकोट 657.50, निलंगा 547.18, देवणी 476.14, शिरूर अनंतपाळ तालुक्यात 432.65 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जिल्हयात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 62.99 टक्के पाऊस झाला आहे. यात सर्वांत कमी पाऊस औसा तालुक्यात 44.72 टक्के व सर्वांत जास्त पाऊस अहमदपूर तालुक्यात 88.17 टक्के झाला आहे. इतर लातूर तालुक्यात 49.17 टक्के, रेणापूर 72.22, उदगीर 52.39, चाकूर 61.31, जळकोट 72.83, निलंगा 76.81, देवणी 52.74, शिरूर अनंतपाळ तालुक्यात 60.73 टक्के पाऊस झाला आहे.