esakal | हिंगोली जिल्ह्यात पदवीधरसाठी ६७ टक्के मतदान 
sakal

बोलून बातमी शोधा

4election

पदवीधर मतदारसंघाच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यात ३९ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. प्राप्त आकडेवारी वरून जिल्ह्यात ६७ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. 

हिंगोली जिल्ह्यात पदवीधरसाठी ६७ टक्के मतदान 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : पदवीधर मतदारसंघाच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात ३९ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवारीवरून जिल्ह्यात ६७ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. 

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३९ केंद्रावर सकाळी आठ ते पाच यावेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात पदवीधरसाठी एकूण १६ हजार ७६४ मतदार आहेत. यापैकी महिला तीन हजार १३३ तर पुरुष १३ हजार ६३१ मतदार आहेत. सकाळी आठ ते चार यावेळेत झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण आठ हजार ८७४ मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये एक हजार २२३ महिला मतदार तर सात हजार ६५७ पुरुष मतदारांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये ३९.०४ एवढी महिलांची टक्केवारी आहे. तर ५६.१३ एवढी पुरुषाची टक्केवारी आहे. चार वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारी वरून जिल्ह्यात ५२.१३ टक्के मतदान झाले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवडणूक उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह अधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यासह राजकीय नेते खासदार राजीव सातव, हिंगोली पालिकेचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, राजेश पाटील गोरेगावकर, माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर आदींनी देखील मतदानाचा हक्क बजावला. 

तगडा पोलिस बंदोबस्त 
पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने खबरदारी म्हणून ३९ मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्स पाळत, सॅनिटायझर व थर्मल तपासणी करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली होती. त्यामुळे येणाऱ्या मतदारांची तपासणी करूनच आत सोडले जात होते. पदवीधर निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. 

वसमतला ६९.६१ टक्के मतदान 
वसमत : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी (ता.एक) शहरातील चार व ग्रामीण भागातील सहा अशा दहा मतदान केंद्रावर सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत दोन हजार ४९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी चार वाजेपर्यंत एकुण ५६.४६ टक्के मतदान झाले आहे. शहरातील तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व दोन उपविभागीय सार्वजनिक बांधकाम कार्यालय या चार मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजेपासून मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड संदर्भात केलेल्या सुचनांनाचे पालन होताना दिसले. मतदानासाठी आलेल्या मतदारांचे तापमान तपासणी तसेच मास्कचा वापर व सॕनिटायझर वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. दुपारी बारानंतर कमी झालेली गर्दी दुपारी चारपासुन पुन्हा मतदान केंद्रावर दिसू लागली होती. दूपारी चार वाजेपर्यंत एकुण चार हजार ४०६ मतदारापैकी दोन हजार ४९५ मतदारांनी हक्क बजावल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ज्याची टक्केवारी ५६.४६ टक्के आहे.

हेही वाचा - परभणी जिल्ह्यात पदवीधर मतदानाचा टक्का वाढला 

कळमनुरी तालुक्यात ६१.६४ टक्के मतदान 
कळमनुरी : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकित मंगळवारी तालुक्यातील आठ मतदान केंद्रावरून मतदान घेण्यात आले. एकूण तीन हजार ८०६ मतदारांपैकी दोन हजार ३४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यामधील मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची टक्केवारी ६१.६४ टक्के एवढी आहे. कळमनुरी शहरामधील प्राथमिक शाळा विकास नगर एकुण मतदार ८०९ पैकी ४४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषद हायस्कूल कळमनुरी एकूण मतदार ७८० पैकी ४७४ , जिल्हा परिषद हायस्कूल नांदापूर एकुण मतदार ३२० पैकी १८७, जिल्हा परिषद प्रशाला आखाडा बाळापुर एकुण मतदार ९६२ दोन मतदान केंद्रावरून ६३२ मतदारांनी मतदान केले. जिल्हा परिषद डोंगरकडा येथील केंद्रावरील ४८६ मतदारांपैकी ३३७ मतदारांनी मतदान केले, वारंगा फाटा येथील केंद्रावरील २८२ मतदारांपैकी १८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकोडी येथील केंद्रावरील एकूण १६७ मतदारांपैकी ९७ मतदारांनी मतदान केले. तालुक्यातील एकूण तीन हजार ८०६ पदवीधर मतदारांपैकी दोन हजार ३४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये दोन हजार ४९ पुरुष पदवीधर तर २९७ महिला मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती कार्यालयीन सूत्रांनी दिली आहे. 

हेही वाचा - परभणीतून नऊ हजार ६०० रुपयांच्या खोट्या नोटा जप्त

जिल्हाधिकारी जयवंशी मतदानासाठी रांगेत 
हिंगोली : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. या वेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर भेट देवून मतदान केंद्राची पाहणी केली. जिल्ह्यात ३९ मतदान केंद्रे असून या सर्व मतदान केंद्रावर सकाळी आठ वाजेपासून सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने मतदानाला येणाऱ्या सर्व मतदाराची थर्मल गन व ऑक्सिमीटरद्वारे ताप व ऑक्सिजनची तपासणी करण्यात आली. तसेच या सर्व मतदान केंद्रावर सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला आहे. मतदानासाठी रांगेत येणाऱ्या मतदारांमध्ये सामाजिक अंतराचे तंतोतत पालन करण्यात आले.  

गैरहजर राहिल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव 
कळमनुरी : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता आचारसंहिता पथकात नियुक्ती केली असतानाही पालिकेचे मुख्याधिकारी उमेश कोठीकर अनधिकृतपणे गैरहजर असल्याचे आढळून आल्यानंतर मंगळवारी (ता.एक) तहसीलदार दत्तू शेवाळे यांनी श्री.कोठीकर यांचा निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता कळमनुरी पालिकेचे मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांची निवडणूक कामी शहरी भागाकरिता आचारसंहिता व कायदा व सुव्यवस्था प्रमुख म्हणून निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवारी निवडणुकीच्या दिवशी शहरातील प्राथमिक शाळा विकासनगर येथील मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आलेल्या उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर व प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार दत्तू शेवाळे यांनी मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी मतदान केंद्रस्थळी आचारसंहिता व कायदा-सुव्यवस्था पथक प्रमुख उमेश कोठीकर हे गैरहजर आढळून आले. यावेळी अधिकाऱ्यांनी अधिक माहिती घेतली असता मुख्याधिकारी उमेश कोठीकर हे मुख्यालयी राहत नसल्याचे आढळून आले. त्यातच मागील चार दिवसांपासून कुठलीही परवानगी न घेता ते गैरहजर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तहसीलदार दत्तू शेवाळे यांनी मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यानंतर त्यांचा निलंबनाबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.  

संपादन ः राजन मंगरुळकर