68 जणांनी अनुभवली राजगड ते रायगड थरारक गिरीभ्रमंती, परभणीतील स्वराज्य ट्रेकर्सच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी नियोजन

गणेश पांडे
Thursday, 31 December 2020

राजगडाच्या  पायथ्याशी असलेले आडवली (ता. वेल्हा जि. पुणे) या गावात ता. 23 डिसेंबर रोजी सर्वजण मुक्कामी पोहोचले. ता. 24 डिसेंबर रोजी सकाळी राजगड चढून झाल्यानंतर बालेकिल्ला, सुवेळा माची, पद्मावती माची आदी ठिकाणे पाहिली.

परभणी ः परभणीतील स्वराज्य ट्रेकर्सच्या नेतृत्वाखाली 68 जणांनी नुकताच राजगड - तोरणा - रायगड हा थरारक गिरीभ्रमंतीचा अनुभव घेतला. शिलेदार अ‍ॅडव्हेंचर क्लब मुंबईने या ट्रेकचे यशस्वी आयोजन केले होते.

राजगडाच्या  पायथ्याशी असलेले आडवली (ता. वेल्हा जि. पुणे) या गावात ता. 23 डिसेंबर रोजी सर्वजण मुक्कामी पोहोचले. ता. 24 डिसेंबर रोजी सकाळी राजगड चढून झाल्यानंतर बालेकिल्ला, सुवेळा माची, पद्मावती माची आदी ठिकाणे पाहिली. महाराणी सईबाईंची समाधीचे दर्शन घेवून रात्रीचे जेवण करुन सर्वांनी राजगडावर मुक्काम केला. रात्री 1 वाजता शिलेदार अ‍ॅडव्हेंचर क्लब मुंबईचे सागर नलावडे व त्यांचा ग्रुप राजगडावर पोहोचला. ता. 25 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता सर्वांनी संजीवनी माचीमार्गे आळू दरवाजातून तोरणा किल्याकडे कूच केली. दुपारी  2 वाजता सर्वजण तोरणा किल्यावर पोहोचले. वाघजाई दरवाजामार्गे भट्टी गावात दुपारी 4 वाजता सर्वजण पोहोचले. सर्वांनी मुक्कामासाठी ते गाव निश्चित केले होते.

हेही वाचापरभणी : कोरोनाच्या संकटातही थॅलेसिमिया रुग्णांना जीवदान, थॅलेसिमिया सपोर्ट ग्रुपची कौतुकास्पद कामगिरी

त्याठिकाणी राम मंदिरात मुक्काम केला. ता. 26 डिसेंबर रोजी भट्टी नावाच्या छोट्या गावातून सिंगापूर नाळेमार्गे सुमारे 33 किलोमिटर अंतर पार करुन वारंगी गावात मुक्काम केला. रस्तात मोहरी या गावात दुपारचं जेवण घेतले. ता. 27 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता वारंगीहून रायगडाकडे प्रयाण करण्यात आले.  या मार्गावर अनेकदा लिंगाणा सुळक्याचे दर्शन झाले. सकाळी 11 वाजता सर्वजण रायगडावर पोहोचले. संपूर्ण गड पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यात आले. अशा पध्दतीने 5 दिवसांचा ट्रेक यशस्वीरित्या पुर्ण  करण्यात आला.

169 ट्रेकर्सचा मोहिमेत सहभाग

बेंगलोर, हैंद्राबाद,औरंगाबाद नांदेड, औंढा, परभणीचे मिळून  68 जण स्वराज्य ट्रेकर्सचे प्रमुख मार्गदर्शक माधवराव यादव व राजेश्वर गरुड यांच्या नेतृत्वाखाली या ट्रेकमध्ये सहभागी झाले होते. तसेच शिलेदार अ‍ॅडव्हेंचर क्लब मुंबईचे सागर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली 91 जण असे एकूण 169 ट्रेकर्स सहभागी झाले होते.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 68 people experienced thrilling trekking from Rajgad to Raigad, successful planning under the guidance of Swarajya Trekkers in Parbhani