Beed | जिल्हा रुग्णालयाकडे थकले ७२ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीड : जिल्हा रुग्णालयाकडे थकले ७२ कोटी

बीड : जिल्हा रुग्णालयाकडे थकले ७२ कोटी

बीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या सुरुवातीला प्रतिबंधात्मक उपचार व उपाययोजनांऐवजी रंगरंगोटी, विद्युतीकरण, साज सजावट, सीसीटीव्ही, सॅनिटायझर, मास्क अशा अती आवश्यक नसलेल्या बाबींवर वारेमाप खर्च केला. परंतु, तिसऱ्या लाटेच्या उपाययोजनांसाठी केलेली तयारी व इतर कामांचे जिल्हा रुग्णालयाकडे तब्बल ७२ कोटी रुपये थकल्याचे समोर आले आहे.

दिवस उजाडताच देणेकरी दारात येऊन बसत असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना इतर कामेही करणे अवघड झाले आहे. तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी जिल्हाभर ऑक्सिजन प्लँट उभारणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा आता देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे श्वास कोंडला आहे. देणेकरी दारात येताच अधिकारी जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे चकरा मारतात. मात्र, जिल्हा नियोजन समितीमध्येही निधी शिल्लक नसल्याने चांगलीच पंचाईत झाली आहे. आता शासन नावाची यंत्रणा यातून कसा मार्ग काढते हे पाहावे लागणार आहे.

कोरोना विषाणू संसर्गाची मागच्या वर्षी सुरुवात झाल्यानंतर अत्यावश्यक बाबींपेक्षा इतर कारणांसाठी विविध विभागांनी उधळपट्टी केली. अगदी १५ रुपयांचा मास्क २०० रुपयांना तर ११०० रुपयांचे थर्मल गन साडेसहा हजारांना खरेदी करण्यात आली. सीसीटीव्हींच्या माध्यमातूनही कोटींची उधळपट्टी कोरोनाच्या नावाखाली करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या आरोग्य संस्थेत (तेलगाव ट्रामा केअर सेंटर) कोरोनाचा दुरान्वय संबंध नव्हता ठिकाणीही सीसीटीव्ही बसविण्यात आले. याच काळात दालनांचे नूतनीकरण, रंगीत पडद्यांची सजावट करून लाखो रुपये उधळले गेले.

विशेष म्हणजे सॅनिटायझरवर तब्बल चार कोटींची उधळण करण्यात आली. तर नुसत्या विद्युतीकरणावर सव्वा सहा कोटींचा खर्च झाला. पहिल्या टप्प्यातील तब्बल ६० कोटी रुपयांच्या उधळपट्टीतले वाटेकरी कोणकोण? हा संशोधनाचा विषय असला तरी आता औषधी, जेवण, तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने उभारलेले ऑक्सिजन प्लँट, बालकांचे व्हेंटीलेटर खरेदीचे तब्बल ७२ कोटी रुपयांची देयके मुदत संपूनही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्रलंबीत आहेत.

देयकांचा आकडा ७० कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. देणेकरी रोजच जिल्हा रुग्णालयात येत असल्याने प्रशासनाला इतर कामे करणेही मुश्कील होऊन बसले आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हा नियोजन समितीकडे निधीसाठी पाठपुरावा सुरु असला तरी जिल्हा नियोजन समितीकडे निधीच शिल्लक नसल्याने आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडे, निधीची मागणी नोंदविण्यात आली आहे.

दिवाळीतला शिमगा टळला पण....

विविध कामे करणाऱ्या यंत्रणांना देयके देण्याची मुदत संपल्याने ही मंडळीही जेरीस आली आहे. दिवाळीतच सर्वांनी एकत्र येत जिल्हा प्रशासन व शासनाविरोधात आंदोलनाची तयारी केली होती. मात्र, काही अधिकाऱ्यांनी समजूत काढून मध्यस्थी केल्याने ऐन दिवाळीतला हा शिमगा टळला. आता मात्र ही मंडळी देखील आर्थिक अडचणीत आली आहे. देयकांची मागणी प्रशासनाकडे नोंदविली असून याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक

हेही वाचा: सोलापूर : सोनेरी माळरानावर मिळाला पांढरा हिरा

loading image
go to top