अबब... ८४ प्रकल्प गाळमुक्त

hingoli photo
hingoli photo

हिगोली : ‘जलयुक्त शिवार’, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध विभागांमार्फत मागील तीन वर्षांत ८४ प्रकल्पांतून (ता. १७) फेब्रुवारी २०२० अखेर १६ लाख ९७ हजार ११७ घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आल्याची माहिती ‘रोहयो’ उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दिली.

शासनाच्या सुचनेनुसार २०१६ ते २०१९ या तीन वर्षांत विविध विभागांच्या वतीने गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामे हाती घेण्यात आली नाहीत. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गंत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली होती. 

जमिनी सुपिक होण्यास मदत

त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनीदेखील शासकीय यंत्रणेमार्फत लोकसहभागातून गाळ काढण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढण्यास मदत होऊन जमिनी सुपिक होण्यास मदत झाली. शिवाय गाळ काढलेल्या तलावांतील जलसाठा वाढल्याने यंदा उन्हाळ्यात फारशी पाणीटंचाई भासली नाही.

कृषी विभागाच्या सोळा प्रकल्प गाळमुक्त

सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने पाणीसाठा झाला होता. यामुळे विहिरी, बोअरची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. दरम्यान, कृषी विभागाकडून मातीनाला बांधकाम तलावातून २०१७ मध्ये सोळा प्रकल्पांतून शासकीय इंधनाद्वारे लोकसहभागातून आठ हजार ५०० घनमीटर गाळ काढण्यात आला. 

१५ कोटी १८ लाख ६३ हजारांचा खर्च

यावर सुमारे ९५ हजार ८८० रुपयांचा खर्च आला. तसेच सिंचन व्यवस्थापन उपविभागामार्फत दहा प्रकल्पांतून २०१६-१७ मध्ये तीन लाख ४८ हजार ४३१, तर २०१७-१८ या वर्षात तेरा कामातून पाच लाख ४१ हजार ३८, २०१८-१९ मध्ये ११ तलावांतून चार लाख ५६ हजार ८३९ घनमीटर गाळ काढण्यात आला. या तीन वर्षांत ३४ प्रकल्पांतून तेरा लाख ४६ हजार ३०८ घनमीटर गाळ काढण्यात आला असून यावर अंदाजे १५ कोटी १८ लाख ६३ हजार एवढा खर्च आला आहे. 

सोळा लाख ९७ हजार ११७ घनमीटर गाळ उपसा 

तसेच जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडून गाव तलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव, अशा एकूण ३२ प्रकल्पांतून तीन वर्षांत तीन लाख २९ हजार ११८ घनमीटर गाळ काढण्यात आला. यावर अंदाजे तीन कोटी ७१ लाख २४ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. या शिवाय पशू पैदास विभागाकडून चिराग शहा दर्गा तलाव व इतर तलावांसह दोन कामांतून १३ हजार १९१ घनमीटर गाळ काढण्यात आला. इंधन कामासाठी एक लाख ४८ हजार ७९४ रुपयांचा खर्च झाला आहे. असा एकूण तीन वर्षांत ८४ कामांतून सोळा लाख ९७ हजार ११७ घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे. यावर १९ कोटी १४ लाख ३४ हजार ७४ अंदाजे खर्च झाला आहे.

पाणीसाठा वाढण्यास मदत

तलावांतील गाळ उपसा केल्यानंतर पाणीसाठ्यात मुबलक प्रमाणात वाढ होण्यास मदत झाली. शिवाय काढलेला गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकल्याने जमिनीही सुपिक बनल्या आहेत. आता सिंचनासाठीदेखील फायदा होत आहे.

पाणीसाठ्यात झाली वाढ

जिल्‍ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून तीन वर्षांत १६ लाख ९७ हजार ११७ घनमीटर गाळ उपसा केला आहे. यासाठी १९ कोटी १४ लाख ३४ हजार ७४ अंदाजे खर्च आला आहे. यामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून शेतकऱ्यांनी गाळ शेतात टाकल्याने जमिनी सुपिक बनल्या आहेत.
-अनुराधा ढालकरी, उपजिल्‍हाधिकारी, रोहयो


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com