esakal | Coronavirus : बीड जिल्ह्यात कोरोनाचे नवीन नऊ रुग्ण, माजलगावात शिरकाव
sakal

बोलून बातमी शोधा

9 new cases of COVID-19 in Beed District

तपासणी झालेल्या २८६ पैकी आठ स्वॅब अहवाल अनिर्णित

Coronavirus : बीड जिल्ह्यात कोरोनाचे नवीन नऊ रुग्ण, माजलगावात शिरकाव

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड  : जिल्ह्याला शनिवारीही (ता.११) धक्काच बसला. तपासणीसाठी पाठविलेल्या ७१७ थ्रोट स्वॅबपैकी २८६ नमुन्यांची तपासणी होऊन यामध्ये नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. आठ स्वॅबचे अहवाल अनिर्णित राहिले. अद्यापही ४३१ स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. 

नव्याने आढळलेल्या नऊ रुग्णांमध्ये बीड शहरातील सहा रुग्णांचा समावेश आहे. यासह परळी, गेवराई, माजलगाव या तीन ठिकाणी प्रत्येकी एकेक नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले. शनिवारी आतापर्यंत पाठविलेल्या स्वॅबचा उच्चांक झाला. तब्बल ७१७ स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. रात्री सात वाजता यातील २८६ स्वॅबच्या तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये
नऊ पॉझिटिव्ह तर २६९ निगेटिव्ह आणि आठ स्वॅबचे अहवाल अनिर्णित राहिले. ४१३ स्वॅबचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. परळीतील स्टेट बँक ऑफ इंडियातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यांच्या सहवासात दीड हजार लोक आल्याने त्यांना क्वारंटाइन करून तेवढ्या लोकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी यातील
पाचशे लोकांचे स्वॅब घेतले होते. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
बीडला पुन्हा धक्काच 
मागच्या काही दिवसांपासून बीड शहरात रुग्णांची संख्या वाढतच आहे. शुक्रवारच्या अहवालात एकट्या बीड शहरात सात रुग्ण आढळले होते. आता शनिवारी पुन्हा नव्या सहा रुग्णांची भर पडली. यासह परळी, गेवराई व माजलगावमध्येही प्रत्येकी एक रुग्ण आढळला. आढळलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या सहवासितांचा आकडा मोठा आहे. 

४३१ स्वॅबच्या अहवालांकडे लक्ष 
शनिवारी पाठविलेल्या ७१७ स्वॅबपैकी अद्यापही ४३१ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. यात परळीतील आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. त्याचा अहवाल कधी येणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 
 

माजलगावात अखेर कोरोनाचा शिरकाव 
माजलगाव : तब्बल साडेतीन महिने शहराच्या वेशीवर थोपविण्यात यश आलेल्या कोरोनाचा माजलगाव शहरात शिरकाव झाला आहे. शनिवारी (ता. ११) आलेल्या अहवालात शहरातील जुना मोंढा भागातील ५२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. साडेतीन महिन्यांपासून राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना सुदैवाने माजलगाव शहरात शिरकाव झालेला नव्हता. आठ दिवसांत बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याने तालुक्याला चोहाबाजूंनी वेढा पडला होता.

दीड महिन्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद रिटर्नची संख्या वाढूनही शहरात कोरोनारुग्ण आढळला नसल्याने शहरातील नागरिक बिनधास्त होते; परंतु शनिवारी आलेल्या अहवालात जुना मोंढा भागातील संगलीहून आलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरात पहिलाच रुग्ण निघाल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे. 


(संपादन : विकास देशमुख)