चंद्रपूरचे ९२ ऊसतोड मजूर पाथरीला हलवले

धनंजय देशपांडे
Tuesday, 31 March 2020

फलटण येथील साखर कारखान्याला कामाला गेलेले ९२ ऊसतोड मजूर कारखाने बंद झाल्यानंतर ता. २६ मार्चला लोणी बु (ता.पाथरी) येथील तांड्यावर येऊन दाखल झाले होते. परंतु पुढे जाण्यासाठी रस्ते बंद असल्याने ते लोणी येथे अडकून पडले होते.

पाथरी (जि.परभणी) : फलटण येथील साखर कारखान्याला कामाला गेलेले ९२ ऊसतोड मजूर कारखाने बंद झाल्यानंतर ता. २६ मार्चला लोणी बु (ता.पाथरी) येथील तांड्यावर येऊन दाखल झाले होते. परंतु पुढे जाण्यासाठी रस्ते बंद असल्याने ते लोणी येथे अडकून पडले होते. या मजुरांची मंगळवारी (ता. ३१) वैद्यकीय तपासणी करून होम कॉर्नटाइन करत त्यांना पाथरीत हलवण्यात आले.

पाथरी तालुक्यातील लोणी बु येथील ऊस तोडणी मुकदम शामराव पवार यांनी कर्नाटक राज्यातील एका करखाण्यासोबत करार केला होता. चार टोळ्यातुन जवळपास १०० मजूर ऊसतोडणीसाठी नेण्यात आले होते. त्यातील ७० मजूर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील आहेत. कारखान्याचे गाळप बंद झाल्यानंतर हे मजूर ता. २४ मार्च रोजी फलटण येथून ट्रॅक्टरने थेट परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील लोणी बु येथील तांड्यावर म्हणजेच मुकदमाच्या गावी आले. परंतु संचारबंदी असल्याने हे मजूर चार दिवसापासून हे मजूर लोणी तांड्यावर अडकून पडले होते. त्यांच्याकडे असलेले सर्व रेशन संपल्याने हे मजूर चांगलेच अडचणीत सापडले होते. शेवटी त्यांनी दोन दिवस लोणी शिवारात चक्क कापूस वेचून आपली गुजराण केली.

हेही वाचा - आता मार नाही... थेट कारवाईच..!

 हातावर होमकॉर्नटाइनचे शिक्के
प्रशासनाला या बाबत माहिती मिळाल्यानंतर सकाळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ के. पी. चौधरी, आरोग्य सहाय्यक कदम, पवार व आरोग्य सेवकअहेमद अन्सारी, माने, नागरगोजे व झानवाल यांनी लोणी येथील शेतात जाऊन त्या सर्व ऊसतोड मजुरांची तपासणी करत त्यांच्या हातावर होमकॉर्नटाइनचे शिक्के मारले. तर दुपारी चार वाजता प्रशासनाने आधारदेत त्या सर्व मजुरांना एक वाहनाने पाथरी शहरातील महात्मा फुले मंगल कार्यालयात हलवण्यात आले.

हेही वाचा ....

पाथरी पालिकेतर्फे ‘जेवणाचा डबा’
पाथरी (जि.परभणी) :
संचारबंदीच्या काळात गोरगरीब व बेघर नागरिक उपाशी राहू नयेत यासाठी मंगळवारपासून (ता. ३१) नगर परिषदेच्या वतीने जेवणाचे डबे देणार असून त्याची सुरवात मंगळवारी (ता. ३१) आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते करण्यात आली. पाथरी शहरात बेघर असलेल्या व हातावर पोट असलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. संचारबंदीच्या काळात त्यांची उपासमार होऊ नये या उद्देशाने नगर परिषदेच्या वतीने मंगळवारपासून घरपोच जेवणाचे डबे देण्याची सोय करण्यात आली आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते काही गरीब कुटुंबांतील सदस्यांना जेवणाचे डबे देण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी कारभारी दिवेकर. प्रभारी पोलिस निरीक्षक के. बी. बोधगिरे, राघवेंद्र विश्वामित्रे, बी. यू. भाले यांची उपस्थिती होती. दरम्यान, शहरातील बेघर व हातावर पोट भरणाऱ्या तसेच दवाखान्यात आलेल्या गरजूंना पालिका प्रशासन पोलिसां मार्फत हे डबे पोचविणार आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 92 Chandrapur laborers moved to Pathari,parbhani news