आता मार नाही... थेट कारवाईच..!

गणेश पांडे
Tuesday, 31 March 2020

परभणी येथे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या २५ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

परभणी : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी रस्त्यावर फिरू नका, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर निघू नका, अशी अनेक वेळा विनंती करूनदेखील परभणी शहरातील बेजवाबदार असणारे लोक रस्त्यावर येत आहेत. अशा लोकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (ता. ३१) सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशा २० ते २५ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारावाईचा बडगा उगारला.

हेही वाचा -  वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा !

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याच बरोबर लोक एका ठिकाणी जमा होऊ नयेत यासाठी संचारबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. असे असतांनाही अनेकजण रस्त्यावर विनाकारण फिरत असल्यामुळे पोलिसांनी सुरवातीच्या काळात बळाचा वापर करून पाहिला. त्यानंतर पोलिसांनी विनंती करण्यास सुरवात केली. दररोज रस्त्यावर फिरून पोलिस घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन करत आहे. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष करून अनेकजण बेजबादारपणे फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंगळवारी (ता .३१) सकाळपासूनच स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने रस्त्याने विनाकारण भटकणाऱ्या २० ते २५ जणांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - दोन चपात्या कुणाला पुरणार साहेब..?

१२ जणांचे १२ कारणे....
पोलिसांनी पकडलेल्या २० ते २५ जणांना पोलिसांनी का बाहेर पडला, असे विचारल्यानंतर अनेकांनी अनेक खोटी कारणे दाखविण्यास सुरवात केली. त्यात मेडिकल आणण्यासाठी चाललो... किराणा आणण्यासाठी चाललो... नातेवाईक आजारी आहेत...अशा खोट्या कारणांसह सहजच बाहेर आलो, असेही कारणे या बेजबादार नागरिकांनी दिले.

कृपया समजून घ्या... वेळ खराब आहे
लोकांनी कृपया समजून घ्यावे. बाहेर पडला तर कोरोनाचा संसर्ग नक्कीच होणार, यात शंका नाही. अवघे जग या संसर्गाचा सामना करत आहे. तुमच्या संरक्षणासाठी पोलिसांना ही कारवाई करावी लागत आहे. कृपया बाहेर पडू नका, अशी मी विनंती करत आहे.
- प्रवीण मोरे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, परभणी

हेही वाचा ...

तीन ठिकाणी भरणार भाजीमंडई
जिंतूर(जि.परभणी) :
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ३१) तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी सामाजिक अंतर राखण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. या वेळी तीन ठिकाणी भरणार भाजीमंडई भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सुरेश शेजूळ, आमदार मेघना बोर्डीकर, पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, आपत्ती व्यवस्थापन सेवा समितीचे सदस्य, व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. भाजीमंडईमधील होत असलेली गर्दी थांबविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आता शहरातील आठवडे बाजार, पशुवैद्यकीय रुग्णालय तसेच जिल्हा परिषद मैदान या तीन ठिकाणी रोज सात ते ११ दरम्यान भाजीमंडई भरणार आहे. नागरिकांनी भाजीमंडईत गर्दी न करता कुटुंबातील केवळ एकच सदस्याला पाठवावे, असे आवाहन या वेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच नगर पालिका प्रशासनातर्फे बेघर मजूर व गोरगरिबांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against those who move out of the way,parbhani news