९५ वर्षांचा ‘तरुण’ देतोय व्यायामाचे धडे !

कृष्णा पिंगळे
Sunday, 15 December 2019

सोनपेठ येथील ९५ वर्षांचे तरुण गंपूअप्पा रनबावरे हे सत्तर वर्षांपासून सातत्याने व्यायाम करून आपले मन व शरीर ताजे आणि तरुण ठेवण्याचे काम करत आहेत. तरुणांचे गंपूअप्पा हेच ‘आयकॉन’ ठरले आहेत.

सोनपेठ (जि.परभणी) :  अवघ्या ९५ वर्षांचा व्यक्ती ‘तरुण’ असल्यागत आजच्या तरुणाईला लाजवेल असा उत्साह आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आजही मन आणि शरीर जोपासण्याचे काम करणाऱ्या गंपूअप्पांनी तरुणांना व्यायामाचे धडे देण्याचा छंद अंगिकारला आहे. हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्य संवर्धनासाठी व्यायामाचे ‘फॅड’ आज प्रत्येकजणात दिसून येते. परंतू, सत्तर वर्षे सातत्याने व्यायाम करून आपले मन व शरीर ताजे आणि तरुण ठेवण्याचे काम ९५ वर्षांचे तरुण गंपूअप्पा रनबावरे हे करीत आहेत.

तरुणांचे अनेक युथ आयकॉन असतात. परंतु, सोनपेठ शहरातील व्यायाम करणाऱ्या तरुणांचे गंपूअप्पा हेच ‘आयकॉन’ ठरले आहेत. 
सकाळी व्यायाम करणाऱ्या तरुणांना पहाटे चार वाजताच उठून सिंगल बार, डबल बार, दगडी गोट्या उचलणे, मुदगल फिरविणे यासारख्या अत्यंत पुरातन आणि शास्त्रोक्त व्यायामाचे प्रकार शिकविण्यात गंपूअप्पा तरबेज आहेत. त्यांच्या या विशेष प्राविण्याचा लाभ घेण्यासाठी शरीरयष्टी कमावणारे तरुण हिरिरीने पुढे येत आहेत.  

हेही वाचा :  अध्यात्माला दिली सामाजिकतेची झालर

अठराव्या वर्षापासून व्यायामाला सुरवात

सन १९२५ साली लातूर जिल्ह्यातील धर्मापुरी येथे जन्म झालेल्या गंपुअप्पा मारोती रणबावरे यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून व्यायामाला सुरवात केली. तेलाच्या घाण्यावर मजुरीसाठी ते सुमारे साठ वर्षांपूर्वी सोनपेठ शहरात आले. अनेक वर्षे तेलाच्या घाण्यावर काम केल्यानंतर त्यांनी बैलगाडीने वाहतुकीचा व्यवसायदेखील केला. व्यापाऱ्यांच्या मालाची लातूर तसेच इतर ठिकाणी वाहतूक ते बैलगाडीने करीत असत. आजही गंपुअप्पा कोणावर अवलंबून न राहता दररोज तीस किलो तेल डोक्यावर घेऊन गावोगावी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. सुरवातीपासून केलेल्या व्यायामामुळे त्यांनी अजूनही एकदाही दवाखान्याची पायरी न चढल्याचे ते सांगतात. एवढे ओझे वाहूनही त्यांना दम लागत नसल्याने अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात. धडधाकट माणूसदेखील एक दोन किलोमीटर चालला की दमून जातो. परंतु, गंपूअप्पा मात्र, आजही डोक्यावर तिस किलो वजन घेऊन पंधरा ते वीस किलोमीटर अंतर हे सहज पार करतात. 

 शासनाच्या सुविधांचा घेतला नाही लाभ  
इथे ६५ वर्षे वय पूर्ण होण्याआधीच अनेक नागरिक शासनाच्या अनेक योजनांचे लाभ घेतात. परंतु, वयाची शंभरी गाठणाऱ्या गंपुअप्पांना वडिलांची शिकवण मात्र, तसे करू देत नाही. आपण कायम दात्याच्या भूमिकेत राहावे, मागणाऱ्यांच्या नाही, ही वडिलांनी दिलेली शिकवण कायम स्मरणात ठेवणारे गंपुअप्पा हे शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ घेत नाहीत. त्यांचा हा करारी बाणा अनेकांना आदर्श देणारा ठरत आहे. 

हेही वाचा :  चक्क कडूलिंबावरच ‘अळी’चा प्रादुर्भाव !

प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
गंपुअप्पा म्हणजे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना कुठलेही व्यसन नाही. ते साहसी, धाडसी व व्यायामासाठी सातत्याने प्रवृत्त करणारे आहेत. त्यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा. गंपुअप्पासारखीच व्यायामाची आवड निर्माण झाल्यास निरोगी व सशक्त भारत तयार होऊ शकते, असे एल. के. फिटनेस क्लबचे नितेश लष्करे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 95 year old 'young' giving exercise lessons!