जायकवाडीचा पाणीसाठा 97 टक्‍के

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

येथील जायकवाडी धरणात पाणलोट क्षेत्रातून पाणी येण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, धरणाचा पाणीसाठा 97 टक्‍के झाला आहे. त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी शुक्रवारी (ता. 13) दिली.

पैठण (जि.औरंगाबाद) : येथील जायकवाडी धरणात पाणलोट क्षेत्रातून पाणी येण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, धरणाचा पाणीसाठा 97 टक्‍के झाला आहे. त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी शुक्रवारी (ता. 13) दिली.

गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा नाशिक जिल्ह्यातील गोदावरीला आलेल्या महापुरामुळे मृत साठ्यात गेलेल्या धरणाचा साठा जिवंत झाला. यानंतरही नाशिक जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाल्याने धरणाची पातळी वाढत गेली. धरण 90 टक्के भरल्यामुळे धरण व्यवस्थापनाने 15 ऑगस्ट रोजी धरणाचे आठ दरवाजे उघडण्याचा निर्णय घेऊन गोदापात्रात पाणी सोडले होते. हा पाण्याचा विसर्ग पंधरा दिवस सुरू होता. यानंतर पाणी बंद करण्यात आले. परंतु आता पुन्हा पाणी सोडण्याची वेळ येणार असल्याची शक्‍यता जलसंपदा विभागाने व्यक्‍त केली.

उजव्या कालव्यातून 900 क्‍युसेक विसर्ग
जायकवाडी धरणाची पाणीपातळी 1521.43 फूट असून 463.732 मीटर आहे. पाण्याची आवक 12 हजार 615 क्‍युसेक आहे. एकूण पाणीसाठा 2840.977 दशलक्ष घनमीटर व जिवंत पाणीसाठा 2102.871 दशलक्ष घनमीटर आहे. उजव्या कालव्यातून 900 क्‍युसेक पाणी सुरू असल्याची माहिती सहायक अभियंता संदीप राठोड यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 97 Percent Water Storage In Jayakwadi