A. P. J. Abdul Kalam : प्रज्ञावंत प्रेषित: भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. APJ Abdul Kalam Jayanti

A. P. J. Abdul Kalam : प्रज्ञावंत प्रेषित: भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम

जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर म्हणतो, "काही माणसं जन्मताच महान असतात, काही कठीण परिश्रमाने महानता प्राप्त करतात आणि काहींवर महानता लादली जाते." या व्यक्तीमत्वापैकी पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात बसणारे व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम! आधुनिक भारताच्या इतिहासात भारतीय तरुण-मध्यमवर्ग-बुजुर्ग स्त्री-पुरुषांच्या मनावर सर्वार्थाने अधिराज्य गाजवणारी व्यक्तिमत्व दुर्मिळच! अशाच प्रकारच्या व्यक्तीमत्वांपैकी वीस-एकविसाव्या शतकांतील महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम! जवळपास ८३ वर्षे त्यागपूर्ण आयुष्य जगलेले गुरुवर्य डॉ.कलामांचा जीवनपट सर्वांनाच थक्क करणारा आहे!

जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या मुस्लीम कुटुंबात जन्मलेले कलाम म्हणजे चार मुले आणि एका मुलीच्या आई-वडिलांचे शेंडेफळ! वडील एका मशिदीचे इमाम आणि  रामेश्वरम ते धनुषकोडी दरम्यान भक्तांची ने-आण करणारे नावाडी. लहानपणापासूनच घरात धर्मसहीष्णू वातावरण होते. याचा परिपाक म्हणजे कलाम एकाचवेळी मशिदीत आणि रामेश्वरमच्या मंदिरात जायचे असा उल्लेख त्यांनी 'अग्निपंख' आत्मचरित्रात केला आहे. घरची जेमतेम परिस्थितीमुळे कलामांनी आपल्या भावाला वर्तमानपत्र वाटायला मदत केली. भरधाव धावणाऱ्या रेल्वेतून पडणारे वर्तमानपत्रांचे गठ्ठे तरुण कलाम जमा करायचे आणि वाटप करायचे. अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेतांना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. कलामांना फायटर पायलट व्हायचे होते परंतु त्यांचे पायलट होण्याचे स्वप्न अधुरे राहिले! मात्र कलामांनी आपलं प्रयत्नांचे शस्त्र म्यान केले नाही. याचाच परिपाक म्हणजे आय.आय.टी मद्रास येथून पदवी पूर्ण झाल्यानंतर डी.आर.डी.एस. मध्ये त्यांची निवड झाली आणि त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पहिलेच नाही!

त्यानंतर त्यांच्या संशोधनाचे विमान सुसाट सुटले. त्यांनी सुरुवातीला एक छोटेसे हॉवरक्राफ्ट डिझाईन करून आपल्या संशोधन कार्याची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर डॉ.विक्रम साराभाई, डॉ.ब्रह्मप्रकाश यांच्या मार्गदर्शनात एकावर एक यशाची शिखरे पादाक्रांत करत त्यांनी भारतीय बनावटीचे मिसाईल बनवण्याचे तंत्रज्ञान अंगीकृत करून नव्या भारताच्या संशोधन क्षेत्रात मोठी भरारी घेतली! डीआरडीओ आणि इस्रो सारख्या अत्यंत महत्वपूर्ण आणि जबाबदारीच्या अंतराळ विषयक संशोधन संस्थांमध्ये काम करतांना अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांना झाला. त्याचबरोबर या संस्थांचे संचालक म्हणून काम पाहतांना नव्या पिढीतील अनेक संशोधकांना घडवण्यात डॉ.एपीजे अब्दुल कलामांचा सिंहाचा वाटा आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र विकसित करण्यामध्ये डॉ.कलामांची अत्यंत मोलाची भूमिका राहिली आहे. अणुस्फोट असो की क्षेपणास्त्र प्रक्षेपण, डॉ.कलामांनी देशाच्या संरक्षण कार्यात मोलाचे योगदान दिले आहे! भारतीय बनावटीचे पीएसएलव्ही आणि आयजीएमडीपी तंत्रज्ञान विकसित करून भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र बनविण्याचे संपूर्ण श्रेय डॉ.कलामांना जाते. त्याचबरोबर आण्विक चाचण्या करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाचा विश्वास संपादन करून भारताला जगात अण्वस्त्रधारी देश म्हणून ओळख निर्माण करून देण्याचे काम डॉ.कलामांनी केले हे ही दुर्लक्षून चालणार नाही!

रात्रीचा दिवस करून डॉ.कलाम प्रयोग शाळेत संशोधन कार्यात इतके मग्न असायचे की; अक्षरशः त्यांना त्यांच्या निकाहाची सुद्धा आठवण राहिली नाही आणि नंतर मात्र ते आजीवन अविवाहितच राहिले. वयाच्या साठाव्या वर्षी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचा अर्ज केला असता पंतप्रधान श्री नृसिंहराव यांनी आणखी दोन वर्षे देशसेवा करण्याची विनंती केली आणि प्रधानमंत्र्यांचे संरक्षण सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. वेळेचे बंधन न पाळता अहोरात्र काम करण्याच्या आणि संशोधन क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत असल्यामुळे डॉ.एपीजे अब्दुल कलाम संपूर्ण देशभर एक वैज्ञानिक आणि मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. याचाच परिणाम म्हणजे डॉ.कलामांना २००२ साली केंद्रात एनडीएचे सरकार असतांना सरकारने त्यांना भारताचे ११ वे राष्ट्रपती होण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली.

डॉ.एपीजे अब्दुल कलामांचा राष्ट्रपती कालखंड कायम चर्चेत राहिला. राष्ट्रपती असतांना डॉ.कलाम सातत्याने विद्यार्थी, युवक, सामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमंती केली. विशेषतः त्यांनी बालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हे बालक आणि युवकच उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असून कुटुंब आणि शासनाने युवा पिढीच्या जडणघडणीची काळजी घ्यावी. बालक आणि तरुणांचे व्यवस्थित शारीरिक आणि बौद्धिक संगोपन होणे गरजेचे असून यांना विकसित देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे त्यांनी वारंवार प्रतिपादन केले. प्रज्वलित मने या पुस्तकात त्यांनी एका लहान मुलीने, "मला विकसित भारतात रहायला आवडेल असे प्रतिपादन केले आहे." त्याचबरोबर शिक्षण, गरिबी, आरोग्य यावर सुद्धा कलामांनी राष्ट्रपती असतांना केंद्र सरकारला निर्देश देऊन माहिती तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्याचे सुचविले. त्यामुळे ते "पीपल्स प्रेसिडेंट" म्हणून ओळखले जाऊ लागले!

भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे एक वैज्ञानिक, इंजिनिअर, मिसाइल मॅन, वक्ता, शिक्षक, कवी आणि प्रेरणादायी लेखक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अग्निपंख या छोट्याशा आत्मचरित्राने तरुण, शिक्षक, लेखकांना प्रचंड उर्जा देण्याचे महत्कार्य केले. अल्पावधीतच त्यांचे आत्मचरित्र घराघरांत पोहोचले. याचबरोबर प्रज्वलित मने, मिशन इंडिया, टर्निंग पॉइंट्स,  टार्गेट थ्री बिलियन, माय जर्नी, ए मॅनिफेस्टो फॉर चेंज, फोर्ज युवर फ्युचर, अडवांटेज इंडिया या सारखी प्रेरणादायी आणि देशाच्या विकासाला दिशा देणारी पुस्तके लिहून त्यांनी आपले सर्वांगीण योगदान अधोरेखित केले आहे.

 "वीर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी" या सुविचाराप्रमाणे डॉ.कलामांनी, 'आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतांना आपल्याला मृत्यु यावा' अशी इच्छा एका भाषणात बोलून दाखविली होती. अगदी तसेच, वयाच्या ८३ व्या वर्षी शिलांग येथील आयआयटी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतांना डॉ.कलमांची प्राणज्योत मालवली! एक सच्चा शिक्षक, महान देशभक्त, प्रेरणादायी वक्ता, प्रेमळ हृदयी कवी, मातृ-पितृभक्त, लेखक डॉ.एपीजे अब्दुल कलामांसारख्या व्यक्तीला आपण पारखे झालो! कलामांच्या आठवणीत एक हिंदी कवी

वो एक ऐसा अजीब शक्स था

जो इन्सानियत की मिसाल था

वो सिर्फ एक नाम कलाम नही

बल्की वो खुदा का कमाल था

या ओळी लिहून त्यांचे अमरत्व अधोरखित करतो आहे!

आज आपण सर्वांनी त्यांचे महान कार्य, देशभक्ती, संशोधन, धर्म सहिष्णुता, देशप्रेम, विद्यार्थीप्रेम, एक सच्चा शिक्षक, प्रेमळ माणूस इत्यादी प्रेषितांचे सद्गुण असणारी व्यक्ती आपला आदर्श असली पाहिजे! छत्रपती शिवराय, स्वामी विवेकानंद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनाच आदर्श ठेवून आपल्याला चालावे लागेल. या महान लोकांच्या पाऊलखुणा आदर्श ठेवाव्या लागतील! अंधश्रध्दा, असहिष्णुता, कट्टरता, व्यसनाधीनता, अजिज्ञासूवृत्ती, आततायीपणा इत्यादी दुष्प्रवृत्तीनी नव्या पिढीला विळखा घातला आहे. ही उद्याच्या भारतासाठी धोक्याची घंटा आहे! रात्र वैऱ्याची आहे! हे सर्व थांबण्यासाठी शिक्षक-प्राध्यापक-विद्यार्थी-समाजसुधारक-राजकारणी या सर्वांनी डोळ्यांत तेल घालून या महान लोकांच्या आदर्शावर चालावे लागेल! असे झाल्यासच खऱ्या अर्थाने भारत देश आपल्या स्वातंत्र्याचे शतक सन्मानाने साजरा करेल! तेंव्हा चला, डॉ.कलामांच्या जयंतीदिनी नवा, स्वावलंबी, सहिष्णू, प्रज्ञावंत भारत घडविण्याचा संकल्प करूयात! जय हिंद! जय भारत!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये