लॉकडाउनमध्ये दीड लाख लाभार्थींना ‘शिवभोजन’चा आधार

राजेश दारव्हेकर
Saturday, 6 June 2020

 जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभोजन थाळी वितरण अविरतपणे सुरु आहे. जिल्ह्यातील नऊ केंद्रामार्फत एक हजार थाळ्याचे वाटप करण्यात येत आहे. या मार्फत लॉकडाउनच्या काळात गरजूंना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळाला आहे.

हिंगोली : राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजना गरजूंसाठी वरदान ठरली आहे. जिल्‍ह्यात (ता.२७) मे अखेर नऊ केंद्रातून एक लाख ४० लाभार्थींनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिली. 

जिल्ह्यात शिवभोजन थाळीचे उदघाटन (ता.२६) जानेवारी रोजी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शिवभोजन थाळी योजना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे सुरु आहे. जिल्ह्यातील नऊ केंद्रामार्फत एक हजार थाळ्याचे वाटप करण्यात येत आहे. गरीब, गरजवंताना कमी दरात पोटाला आधार मिळाला असल्याचे श्रीमती संगेवार यांनी सांगितले.

हेही वाचाहंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत 

हिंगोलीत ५६ हजार गरजूंनी घेतला लाभ

जिल्ह्यात हिंगोली येथे तीन केंद्र असून चारशे थाळीचे वितरण केले जाते. यामध्ये सामान्य रुग्णालयात साई माऊली सेवाभावी संस्‍थेतंर्गत सुरू असलेल्या शिवभोजन योजनेत २६ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान ३२ हजार ३५५ थाळीचे वाटप करण्यात आले आहे. तसेच शहरातील मोंढा भागातील सुभाषसिंह वर्मा यांच्या केंद्रामार्फत शंभर थाळीप्रमाणे एक मार्च ते २७ मे या कालावधीत २४ हजार २०८ थाळींचा गरजूना लाभ देण्यात आला. 

कळमनुरीतही लाभार्थींना मदत

कोथळज रोड भागातील साई भोजनालयास शंभरप्रमाणे दोन मार्च ते २७ मे अखेर १५ हजार ८६९ थाळीचे वाटप केले आहे. कळमनुरी येथील प्रकाश भोजनालयास २४ एप्रिल ते २७ मे अखेर ७५ मंजूर थाळीतून १२ हजार ७३ थाळीचे वाटप झाले आहे. येथील जय मातादी महिला बचत गटाकडून चार एप्रिल ते २७ मे अखेर ७५ थाळीप्रमाणे ११ हजार ५३३ थाळीचे वाटप करण्यात आले. 

वसमतमध्ये नऊ हजार थाळीचे वाटप

याचप्रमाणे सेनगाव येथील पृथ्वीराज हॉटेलकडे १५० उद्दिष्ट दिले होते. त्यातून दोन एप्रिल ते २७ मे अखेर दहा हजार १७४ थाळीचे वितरण झाले आहे. वसमत येथील राधाई मेसमार्फत १५० प्रमाणे दोन एप्रिल ते २५ मे अखेर नऊ हजार नऊशे थाळीचे वितरण झाले आहे.

येथे क्लिक कराअबब... ८४ प्रकल्प गाळमुक्त 
 

एक लाख ४० हजार गरजूंना जेवण

 औंढा नागनाथ येथील व्यंकटेश रेस्‍टॉरंटच्या माध्यमातून ७५ थाळीप्रमाणे चार एप्रिल ते २७ मे या कालावधीत नऊ हजार ३१५ थाळीचे वाटप करण्यात आले. जय मल्हार ग्रामविकास प्रतिष्ठान खेरडा येथील संस्थेमार्फत ७५ थाळीप्रमाणे दोन एप्रिल ते २७ मे अखेर चार हजार ८८९ थाळीचे वाटप करण्यात आले. असे एकूण एक हजार मंजूर थाळीतून एक लाख ४० हजार गरजूंना थाळीचे जेवण देण्यात आले आहे.

माफक दरात शिवभोजन थाळी

अडीच महिन्यापासून जिल्ह्यात लॉकडाउन सुरू आहे. गरीब, होतकरू, मजूरदारवर्गांना मिळणारी कामे ठप्प पडल्याने उदरनिर्वाह कसा करावा ? असा प्रश्न पडला होता. परंतु, शासनाने सुरु केलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा गरजू आधार मिळाला आहे. थाळी केंद्राकडून माफक दरात शिवभोजन थाळी दिले जाते की नाही ? याचा आढावा पुरवठा विभागाकडून घेतला जातो.
-अरुणा संगेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी;


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aadhaar Of 'Shiva Bhojan' To 1.5 Lakh Beneficiaries In Lockdown Hingoli News