esakal | अब्दुल सत्तार अखेर शिवबंधनात
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद ः जिल्ह्यातील सिल्लेड विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवारी मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. शिवबंध बांधताना उद्धव ठाकरे. सोबत एकनाथ शिंदे, कृष्णा पाटील डोणगावकर, केशवराव तायडे.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर प्रवेश सोहळा 

अब्दुल सत्तार अखेर शिवबंधनात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झालेले जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार अब्दुल सत्तार आता "शिवबंधना'त अडकले आहेत. सोमवारी (ता. दोन) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईत 'मातोश्री'वर शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्‍यता आहे. 

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्री. सत्तार यांनी बंडखोरी केली. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. सिल्लोड येथे नुकतीच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पोचली होती. यावेळी श्री. सत्तार यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हात देत सत्तारांना बसमध्ये जागा दिली. त्यानंतर भाजपमध्ये जाता-जाता रविवारी (ता. एक) ते शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्यासाठी "मातोश्री'कडे गेले. सत्तार यांना सोमवारी दुपारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर "मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, कृष्णा पाटील डोणगावकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे सदस्य, सिल्लोडचे नगराध्यक्ष, नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना मदत केली होती. 
 
ई-मेलवर पाठविला राजीनामा 
कॉंग्रेसचा राजीनामा दिल्याचा दावा सत्तार यांनी अनेकवेळा केला. मात्र, त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नव्हता. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी कॉंग्रेस उमेदवाराविरोधात प्रचार केला. दरम्यान, आज सकाळी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा ई-मेलद्वारे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवून दिला. त्यानंतर त्यांचे सुपुत्र समीर सत्तार यांच्या हस्ते देखील हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठवून दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

loading image
go to top