
वैजापूर : मुलाचा सुखी संसार बघण्याआधीच वडिलांचा मृत्यू, अपघातात पाच ठार
वैजापूर : लग्न समारंभ आटोपून घराकडे परतणाऱ्या वऱ्हाडाच्या आयशर ट्रकला अपघात होऊन पाच जण जागीच ठार तर २६ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील शिवराई फाट्याजवळ सोमवारी (ता. ३१) पहाटे दोनच्या सुमारास घडली. मृतांमध्ये नवरदेवाच्या वडिलांचा समावेश असून आपल्या मुलाच्या सुखी संसार बघण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातात कविता आबासाहेब वडमारे (वय ४०), प्रज्ञा गौतम गायकवाड (वय १७), ललिता पुंडलिक पवार (वय ४५), मोनू दीपक वाहूळे (वय ८), पंडित शहाजी मोरे (५५, सर्व रा. अंबड औद्योगिक वसाहत परिसर, जि. नाशिक) हे पाच जण ठार झाले तर २६ जण जखमी झाले असून विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अविनाश पंडित मोरे (रा. गौतमनगर, अंबड (नाशिक) यांचा भाऊ वैभव मोरे याचे जालना जिल्ह्यातील हातवण (ता. मंठा) येथे रविवारी सायंकाळी लग्न होते. (Marathwada Accident News)
लग्न सोहळा आटोपून वऱ्हाडी मंडळी रात्रीच्या सुमारास आयशर ट्रकने परत नाशिकला येण्यासाठी निघाले असता रात्री अडीचच्या सुमारास औरंगाबाद-वैजापूर रस्त्यावरील शिवराई गावाजवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या आयशर ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाली. मध्यरात्रीची वेळ असल्याने घटनास्थळी जखमी वऱ्हाडींची मदतीसाठी जोराने आरडाओरड सुरू झाली. त्यामुळे घटनास्थळी काही ग्रामस्थ धावून आले व त्यांनी घटनेची माहिती वैजापूर पोलिसांना दिली.
Web Title: Accident Returning Nashik After Completing Wedding Ceremony
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..