पोलिस गाडीला अपघात; एपीआय हुंडेकरसह चारजण जखमी, बाळापूर- वारंगा मार्गावरील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळापूर पोलिस गाडीला अपघात

पोलिस गाडीला अपघात; एपीआय हुंडेकरसह चारजण जखमी, बाळापूर- वारंगा मार्गावरील घटना

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : आखाडा बाळापूर ते वारंगाफाटा मार्गावर (Balapur Police vechel accident) असलेल्या आडापाटीजवळ ट्रकचे स्टेअरींग रॉड तुटल्याने ट्रक पोलिस वाहनावर येत असल्याचे दिसताच चालकाने सतर्कता बाळगत आपले वाहन रस्त्याच्या खाली घेतले. परंतु त्यांचेही वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आपघात घडला. या अपघातात दोन पोलिस अंमलदार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २१ ) दुपारी घडली आहे. या अपघातात सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकांत हुंडेकर (Api HUNDEKAR) आणि फौजदार हनमंत नकाते बालंबाल बचावले. (Accident- police-vehicle- Four injured- including API Hundekar- incident- on- Balapur-Waranga road)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या भाटेगाव येथे गुरुवारी (ता. २०) रात्री हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, उपनिरीक्षक हनमंत नकाते हे आपल्या काही सहकाऱ्यांसह भाटेगाव येथे गेले होते.

हेही वाचा - गडचिरोली पोलिस स्मृतिदिनीच पोलिसांनी घेतला बदला. नक्षलवादी चकमकप्रकरणी सी-४७ अलर्ट- पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे

तेथे पंचनामा आटोपून सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, फोटोग्राफर दिगंबर शिंदे, चालक प्रकाश कांबळे व अन्य एक जण आखाडा बाळापूरकडे निघाले. पोलिसांचे वाहन आडा पाटीजवळ आले असतांना समोरुन वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकचे स्टेअरींग रॉड तुटले. त्यामुळे वाहन चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले. हा ट्रक पोलिस वाहनावर येत असल्याचे दिसताच चालक कांबळे यांनी आपले पोलिस वाहन रस्त्याच्या खाली उतरवले. मात्र ट्रकचा धक्का लागल्याने पोलिस वाहन उटलले. या अपघातात श्री. हुंडेकर यांच्या पायाला दुखापत झाली तर शिंदेही यात जखमी झाले आहेत. यावेळी पाठीमागून वाहनाने येणाऱ्या ग्रामसेवक रुद्राजी क्षिरसागर, श्री. पोटे, साईनाथ छत्रे, शेख हारुण यांनी त्यांचे वाहन थांबवून पोलिस वाहनातील सर्वांना बाहेर काढले. जखमी झालेल्या शिंदे यांना उपचारासाठी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातानंतर ट्रक चालक मात्र फरार झाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top