कोरोना तपासणीला नेलेल्या आरोपींची बीडच्या रुग्णालयातून धूम 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

सिरसाळा पोलिसांनी दोन्ही आरोपींना शासकीय वाहनाने बीडला आणले. आरोपींना घेऊन दुपारी चार वाजता कारागृहात दाखल केल्यानंतर या आरोपींची कोरोना तपासणी करून आण्याच्या सुचना देण्यात आल्या.

बीड - मारहाण प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावणलेल्या आरोपींना कोरोना तपासणीसाठी रुग्णालयात आणल्यानंतर त्यांनी धुम ठोकल्याची घटना सोमवारी (ता. चार) रात्री १० वाजता घडली. 

शेख इरफान शेख बिबन (नवल्या) आणी असेफ गफार बागवान अशी पलायन केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. सिरसाळा येथील नवाज खान आयुबखान पठाण या युवकास शेख इरफान शेख बिबन (नवल्या) आणि असेफ गफार बागवान या दोघांनी बाहेरगावी जाण्यासाठी दुचाकी का दिली नाही असे म्हणत रस्त्यावर अडवून बेल्ट, दगडाने मारहाण करून जखमी केले. शनिवारी (ता. दोन) घडलेल्या घटनेप्रकरणी या दोन्ही आरोपींना अटक केली.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

परळी न्यायालयाने सोमवारी या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सिरसाळा पोलिसांनी दोन्ही आरोपींना शासकीय वाहनाने बीडला आणले. आरोपींना घेऊन दुपारी चार वाजता कारागृहात दाखल केल्यानंतर या आरोपींची कोरोना तपासणी करून आण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा या दोघांना त्याच वाहनातून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले. जवळ कोणी नसल्याचा फायदा घेत स्वॅब घेण्याआधीच आरोपी इरफान व असेफ याने पलायन केले. या प्रकरणी जमादार शिवाजी मुंडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात पलायन केले म्हणून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused escapes from Beed hospital

Tags
टॉपिकस
Topic Tags: