बीड जिल्हा हादरला: क्रूर प्रियकराने प्रेयसीवर ॲसिड, पेट्रोल टाकून जाळले; पहाटेपासून ते दुपारपर्यंत तरुणी तडफडत राहिली

सुरेश रोकडे
Sunday, 15 November 2020

बीड तालुक्यातील नेकनूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येळंब (घाट) परिसरात एक २२ वर्षीय तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळून आली. पुण्यावरून गावी परतत असताना मध्येच प्रियकराने आपल्या प्रियसीला पेट्रोल, ॲसिड टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.१४) उघडकीस आली.

नेकनूर (जि.बीड)  : बीड तालुक्यातील नेकनूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येळंब (घाट) परिसरात एक २२ वर्षीय तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळून आली. पुण्यावरून गावी परतत असताना मध्येच प्रियकराने आपल्या प्रियसीला पेट्रोल, ॲसिड टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.१४) उघडकीस आली. सदरील तरुणीची रविवारी (ता.१५) बीड येथील जिल्हा रुग्णालयात सकाळी साडेअकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया : अवांतर शुल्क पाहून विद्यार्थी आवाक; हॉस्टेल, मेस केली सक्तीची

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील सावित्रा डिगंबर अंकूरवर (वय २२) ही गावातीलच अविनाश रामकिसन राजुरे (वय २५) याच्यासोबत गेल्या वर्षभरापासून  पुण्यात रिलेशनशिपमध्ये राहत होती. शुक्रवारी (ता.१३) रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान बीड तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात एका खडी क्रेशरजवळ सदरील जोडपे मुक्कामास थांबले. शनिवारी पहाटेच्या सुमारास प्रियकराने आपल्या प्रियसीचा सुरवातीला गळा दाबून, ॲसिड टाकले. त्यानंतर पेट्रोल टाकून अमानुषपणे आग लावली आणि तेथुन आरोपी पसार झाला.

पहाटे ३ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत सदरील तरुणी तडफडत राहिली. दुपारी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची तिच्यावर नजर पडल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या गाडीतुन नेकनुर आणि नेकनुरमधुन ॲम्ब्युलन्सने बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ॲसिड हल्ला आणि पेट्रोलने ४८  टक्के तरुणीचे शरीर भाजले. पीडितेच्या जवाबावरून आरोपी अविनाश रामकिसन राजुरे याच्यावर नेकनूर ठाण्यात  गुन्हा नोंदवण्यात आला असून सदरील प्रकरणाचा तपास  पोलिस उपनिरीक्षक  विलास जाधव हे करित असून सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध वेगात सुरू आहे. 

प्रियसीला पेटवून प्रियकर पळाला
येळंब घाट शिवारात एक जोडपे मुक्कामी थांबले पहाटेच्या सुमारास प्रियकराने आपल्या प्रियसीचा गळा दाबून, ॲसिड टाकले. तो प्रियकर एवढ्यावरच न थांबता त्याने चक्क पेट्रोल टाकून तिला जाळून टाकून तेथून पसार झाला.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acid Attack On Girl By Her Lover Beed News