स्वॅबचा अहवाल लिक करणाऱ्यांविरूद्ध कारवाई, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

विकास गाढवे
सोमवार, 6 एप्रिल 2020

निलंगा येथे एका धार्मिकस्थळामध्ये आढळून आलेल्या बारापैकी आठ परप्रांतीयांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. याबाबत पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिलेला अहवाल सोशल मीडियावर लिक करण्यात आला. हा अहवाल फोडणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. हा अहवाल फॉरवर्ड करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरूद्धही कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.

लातूर : निलंगा येथे एका धार्मिकस्थळामध्ये आढळून आलेल्या बारापैकी आठ परप्रांतीयांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. याबाबत पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिलेला अहवाल सोशल मीडियावर लिक करण्यात आला. हा अहवाल फोडणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. हा अहवाल फॉरवर्ड करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरूद्धही कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.

बारा परप्रांतीयांचा प्रवासाचा इतिहास लक्षात घेता त्यांच्या घशातील द्रावाचे (स्वॅब) नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. शनिवारी (ता.चार) त्याचा अहवाल आला. मात्र, हा अहवाल सोशल मीडियावर लिक झाला. यामुळे मीडियावर चर्चा घडून आली. कोरोनाबाधित रूग्णांची नावे व तपशील उघड करण्यास सरकारने बंदी घातली आहे. मात्र, अहवाल लिक झाल्याने रूग्णांची नावे उघड झाली. यातून काही लोकांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कोरोनापेक्षाही भयंकर होता. हा अहवाल अनेकांनी फॉरवर्ड करून खतपाणी घातले. याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अहवाल फोडणाऱ्यांविरूद्ध पहिल्यांदा कारवाई करण्यात येणार आहे. त्याचा शोध पोलिस घेत असून हा अहवाल सोशल मीडियावर फॉरवर्ड करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशांचाही शोध घेऊन सक्त कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

वाचा ः जिल्हाबंदीची हवी काटेकोर अंमलबजावणी, इतर जिल्ह्यातून सर्रास वाहने लातूर शहरात

आता सोलापूरला तपासणी
जिल्ह्यात संशयित कोरोनाबाधित रूग्णांच्या स्वॅबचे नमुने काढण्याची सोय केवळ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतच होती. आता उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयातही ही सोय करण्यात आली आहे. स्वॅबचे नमुने पूर्वी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात येत होते. यामुळे अहवाल येण्यासाठी चोवीस तास लागायचे. आता नमुने तपासणीसाठी सोलापूरला सुविधा करण्यात आली असून कमी वेळेत अहवाल येणे शक्य होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी या वेळी सांगितले. दरम्यान यंत्रसामग्री आली नसल्याने लातूर येथे तपासणीची सुविधा सुरू करण्यासाठी उशिर होत असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action Against Who Licked Swab Report, Latur